मुंबई : माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामीच्या प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी विशेष न्यायालयात धाव घेतली. ठाकरे आणि राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला होता. तसेच, त्यांना समन्स बजावून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. ठाकरे आणि राऊत यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाच्या पुनर्विचारासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली आहे व महादंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा >>> कुवेतमध्ये अग्नितांडव; ४२ भारतीयांचा मृत्यू ; मजुरांची वस्ती असलेल्या इमारतीत आग
बदनामी करणारा कथित लेख एका महिला पत्रकाराने घेतलेल्या मुलाखतीवर आधारित होता आणि इतर वृत्तपत्रांसह समाजमाध्यमावरूनही तो प्रसिद्ध झाला होता. मात्र, शेवाळे यांनी निवडकपणे आपले वृत्तपत्र आणि आपल्याला लक्ष्य केल्याचा दावा ठाकरे आणि राऊत यांनी अर्जात केला आहे. स्वतंत्र आणि सशक्त माध्यमांचे अस्तित्व हा लोकशाहीचा पाया आहे. राजकीय व्यक्तीची मुलाखत, देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाबाबतची त्यांची मते तसेच कोणाही विरोधात मते प्रकाशित करणे हे माध्यमांचे कर्तव्य असल्याचेही अर्जात म्हटले आहे. त्यामुळे आपल्याविरोधातील तक्रार तथ्यहीन, खोटी आणि बनावट आहे. समन्स बजावण्यात न्यायदंडाधिकाऱ्यांची चूक झाली असून समन्स रद्द न केल्यास आपले कधीही भरून न येणारे नुकसान होईल आणि हे एकप्रकारे न्यायाचा गळा घोटण्यासारखे असल्याचा दावाही ठाकरे आणि राऊत यांनी केला आहे.