गेल्या दोन दिवसांपासून केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या मान्यवर व्यक्तींना भारतरत्न जाहीर केले जात आहेत. त्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. कर्पुरी ठाकूर, स्वामीनाथन यांना जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्कारांची विशेष चर्चा होत आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सातत्याने लक्ष्य केलं आहे. मुंबईत शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरेंनी याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर परखड शब्दांत टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिंदे गट व भाजपावर टीका

“गेल्या ५६-५७ वर्षांत शिवसेनेनं अनेक वादळं अंगावर घेतली आहेत. आत्ताही शिवसेनेला मुळासकट उखडून टाकण्याची फरफरी काहींना आलेली आहेत. त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये की शिवसेनेची मुळं इतक्या खोलवर गेली आहेत, की ती उपटायला गेलात तर तुम्ही तुमच्या मुळांसकट उपटले जाल. त्यामुळे त्या भानगडीत पडू नका”, असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.

Video: “नितीन गडकरी म्हणाले की दिल्लीत काही सन्मानच मिळत नाही”, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा; मोदींवर केला हल्लाबोल!

कर्पुरी ठाकूर यांचा उल्लेख करत टीकास्र

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “पूर्वी भारतरत्न पुरस्कार किती द्यायचे, कुणाला द्यायचे याचं काहीतरी सूत्र होतं. आता आले मोदींच्या मना, कुणालाही देतायत. ज्यांना पुरस्कार दिलेत, ते चुकीचं केलंय असं मी म्हणत नाही. पण हे लोक जेव्हा हयात होते, तेव्हा त्यांना यांनी पराकोटीचा विरोध केला. कर्पुरी ठाकूर यांचं १९७८-७९ साली बिहारमध्ये मंत्रीमंडळ होतं. त्या काळात मंडल आयोग नव्हता. पण कर्पुरी ठाकूर ही पहिली व्यक्ती ज्यांनी सरकारी सेवेत २६ टक्के आरक्षण मागासवर्गीय व वंचितांसाठी आणलं. तेव्हा कर्पुरी ठाकूर यांना जनसंघानं विरोध केला होता. अगदी रस्त्यावर उतरून विरोध केला होता. तेव्हा त्यांना तुम्ही शिव्या दिल्या. आज ७९ सालांनंतर २०२४ साली तुम्हाला बिहारमध्ये मतं हवीत म्हणून कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न दिलं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

स्वामीनाथन यांचाही केला उल्लेख

“स्वामीनाथन यांना देशाचे राष्ट्रपती करा अशी आमची मागणी होती. आता त्यांना भारतरत्न दिलं जातंय. पण मग स्वामीनाथन समितीनं दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करा अशी माझी मागणी आहे. झाड जगवणाऱ्याला जगवणं हे काम स्वामीनाथन यांनी सांगितलं होतं. ते न करता त्यांना भारतरत्न देत आहात. हा पोकळपणा आहे. त्यांना असं वाटत असेल की आपण निवडणुकीच्या तोंडावर अशा लोकांचा सन्मान केला तर त्यांचा संपूर्ण प्रदेश आपल्या पाठिशी येईल. पण एवढा सोपा काळ आता राहिलेला नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.