Uddhav Thackeray Faction comment President Droupadi Murmu: दोन दिवसांपूर्वी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला होता. यासंदर्भात देशभरात बरीच चर्चाही पाहायला मिळाली. महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, राष्ट्रपतींनी फक्त कोलकाता प्रकरणानंतरच संताप व्यक्त केला, असा मुद्दा आता ठाकरे गटाकडून उपस्थित केला जात आहे. तसेच, बदलापूरमध्ये अत्याचार झालेल्या चिमुरड्या राष्ट्रपतींच्या कुणीच लागत नाहीत का? असा प्रश्नही ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.
काय म्हणाल्या होत्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये बलात्काराच्या घटनांमुळे भयावह असल्याचं नमूद केलं होतं. “कोलकाता येथील घटना वेदनादायक आणि भयावह आहे. बस आता खूप झालं. ज्यावेळी कोलकाता येथे विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत होते, तेव्हा या प्रकरणातील आरोपी खुलेआम फिरत होते”, असं राष्ट्रपती म्हणाल्या. तसेच, “समाजाची दयनीय मानसिकता महिलांना कमी लेखते. १२ वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणानंतर अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. मात्र, समाजाने याकडे दुर्लक्ष केलं. आपल्या समाजाला सामूहिक स्मृतिभ्रंशाचा त्रास झाल्याचे दिसून येते”, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या या प्रतिक्रियेवर ठाकरे गटाकडून टीकात्मक भूमिका मांडण्यात आली आहे. ‘महिला अत्याचारांमुळे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या चिंतित, अस्वस्थ व थोड्या भयग्रस्तही झाल्या आहेत, पण त्यांची चिंता फक्त कोलकात्यात घडलेल्या महिला अत्याचाराबाबत आहे. संपूर्ण देशातील घटनांविषयी त्यांच्या मनात वेदनेचे तरंग उठलेले नाहीत’, अशी तक्रार सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
“राष्ट्रपतींना गांभीर्य कळले प. बंगालातील घटनेमुळे”
‘देशात महिलांवरील अत्याचार, हत्या अशा गुन्ह्यांचा आलेख वाढतच आहे, पण राष्ट्रपतींना अशा घटनांचे गांभीर्य कळले ते प. बंगालातील बलात्कार व हत्येच्या घटनेमुळे. राष्ट्रपतींनी प. बंगालातील त्या दुर्घटनेवर चिंता व्यक्त केली. हे भाजपाधार्जिणे राजकारण आहे. मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढली गेली. महिलांची भररस्त्यात उभे करून विटंबना करण्यात आली. त्यांच्या हत्या केल्या गेल्या. खरे तर ‘आता पुरे’ या भावना राष्ट्रपतींनी त्या वेळी व्यक्त करायला हव्या होत्या”, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
अग्रलेख: अब द्रौपदी प्रश्न न पूछेगी…
“सरकारचे लक्ष्य पं. बंगाल असल्याने…”
‘बदलापुरातील अल्पवयीन मुलींवर शाळेतच अत्याचार झाले. लोक रस्त्यावर उतरले, पण भाजपा-मिंध्यांचे शासन बुळचटांप्रमाणे पाहत राहिले. राष्ट्रपतींनी तेव्हा तत्काळ आपल्या संवेदना व्यक्त करायला कुणाची हरकत होती? पण प. बंगालच्या निमित्ताने राष्ट्रपती भवनास स्त्री अत्याचारांची आठवण झाली. मणिपूरच्या महिलांचा आणि बदलापूरच्या चिमुरडय़ांचा तर विसरच पडला. उत्तर प्रदेश, बिहारातही महिलांवरील अत्याचारांनी उच्चांक गाठला आहे, पण सरकारचे ‘लक्ष्य’ प. बंगाल सरकार असल्याने राष्ट्रपती भवनाने प. बंगालातील एका घटनेवर चिंता व्यक्त केली’, अशा शब्दांत ठाकरे गटानं राष्ट्रपतींच्या प्रतिक्रियेवर भूमिका मांडली आहे.
“राष्ट्रपतींची चिंता याच योजनेचा भाग”
‘हे प्रकरण वाटते तितके साधे दिसत नाही. कायदा-सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचारांचे भांडवल करून प. बंगालात राष्ट्रपती राजवट तर लावली जाणार नाही ना? अशी भीती आम्हाला वाटते. राष्ट्रपतींनी प. बंगालातील घटनेवर व्यक्त केलेली चिंता हा त्याच योजनेचा एक भाग दिसतो. कटाचा भाग आहे असे म्हटले तर राष्ट्रपती भवनाच्या प्रतिष्ठेस धक्का बसेल, पण प. बंगालचे सरकार अडचणीत आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत हे मात्र नक्की”, असा दावाही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.