लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारविरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत. आज ( १८ जुलै ) विरोधकांची दुसरी बैठक बंगळुरु येथे पार पडली. या बैठकीत महाआघाडीचे नाव ‘इंडिया’ असे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात ‘इंडिया’ विरुद्ध ‘एनडीए’ अशी लढाई पाहायला मिळणार आहे. ही बैठक संपल्यावर विरोधकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही लढाई हुकूमशाहीविरोधात असल्याचं सांगितलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “दुसरी बैठक यशस्वी झाली आहे. हुकूमशाहीविरोधात जनता एकत्र येत आहे. ‘इंडिया’साठी आपण एकत्र आलो आहोत. अनेकांनी मला विचारलं की, वेगवेगळ्या विचारधारेचे लोक आहेत. राजकारणात विचारधारा वेगळी पाहिजेलच. यालाच लोकतंत्र म्हणतात. पण, ही लढाई आपल्या पक्षांसाठी नाही. काहींना असं वाटत आहे, की कुटुंबासाठी लढाई लढत आहे. पण, हा देश आमचं कुटुंब आहे. आम्ही या कुटुंबासाठी लढत आहोत. कारण, या कुटुंबाला आपल्याला वाचवायचं आहे.”
“आपली लढाई एक पक्ष किंवा एका व्यक्तीविरोधात नाही. आमची लढाई निती आणि हुकूमशाहीविरुद्ध आहे. एकेकाळी स्वातंत्र्यांची लढाई झाली होती. आता स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. या स्वातंत्र्यासाठी आम्ही सगळे एकत्र आले आहोत. आपण यशस्वी होऊ,” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा : विरोधकांचं नेतृत्व कोणाकडे, INDIA चा चेहरा कोण असेल? मल्लिकार्जुन खरगे म्हणाले…
“आता काय होणार? अशी भीती देशातील लोकांमध्ये आहे. त्यांना सांगू इच्छितो की, घाबरू नका, आम्ही आहोत. जसा ‘मैं हूं ना’ चित्रपट आला होता. तसे ‘हम हैं ना’. चिंता करण्याची गरज नाही. एक व्यक्ती आणि एक पक्ष देश होऊ शकत नाही. जनता म्हणजे देश आहे. देशातील जनता ‘इंडिया’ बनून समोर येईल. आपल्या देशाला आपण सुरक्षित ठेवू. पुढील बैठक मुंबईत होणार आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.