लोकसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना राज्यासह देशभरात राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये पडलेली फूट व त्यानंतर अनुक्रमे आलेले सर्वोच्च न्यायालय व विधानसभा अध्यक्षांचे निकाल यावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे.
“रामाचे सत्य वचन मोदींच्या अंगात…”
“मोदी पावलापावलांवर खोटे बोलतात व त्या खोटेपणातच स्वतःला गुंतवून ठेवतात. रामाचे मंदिर अयोध्येत उभे राहिले. मोदी यांनी मंदिरात श्रीरामाची राजकीय प्राणप्रतिष्ठा केली, पण रामाचे सत्य वचन काही मोदींच्या अंगात भिनले नाही. मोदी यांच्या सत्तेचा पाया भ्रष्टाचाराच्या टेकूवरच उभा आहे व त्याचा मुखवटा रोज गळून पडतोय”, असं म्हणत सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात आलं आहे.
“…तोपर्यंत मोदींनी सार्वजनिक जीवनात वावरू नये”
“निवडणूक रोखे’ म्हणजे इलेक्टोरल बॉण्ड्समधील भाजपचा भ्रष्टाचार काल सुप्रीम कोर्टानेच उघड केला. तरीही श्रीमान मोदी भ्रष्टाचारमुक्त विकासाची गाथा लोकांपर्यंत पोहोचविण्याची भाषा करतात, हे हास्यास्पद आहे. भाजपच्या तिजोरीत सात हजार कोटींचे ‘दान’ देणारे हे नवे कर्ण कोण? याचा खुलासा झाल्याशिवाय मोदी यांनी सार्वजनिक जीवनात वावरू नये”, असा खोचक सल्ला ठाकरे गटानं मोदींना दिला आहे.
“मोदी यांचे बोलणे लोक आता गांभीर्याने घेत नाहीत. त्यांचा नीलकंठ झाला आहे. इतर पक्षांतील भ्रष्ट नेत्यांचे विष ते रोज प्राशन करतात व विरोधकांच्या नावाने तांडव करतात. अंधभक्तही भांग पिऊनच टाळ्या वाजवतात. काय करायचे?” असा खोचक सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.
“छगन भुजबळ यांच्या घोटाळ्याची फाईलच हरवल्याचा चमत्कार…”
“अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे मोदीच होते व आता त्यांना भाजपमध्ये घेऊन लगेच राज्यसभेवरही घेतले. अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी, दादा भुसे वगैरे मंडळींवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपवालेच होते व आज हे सर्व लोक भाजपच्या विकास यात्रेचे भोई आहेत. छगन भुजबळ यांच्या घोटाळ्याची फाईलच हरवल्याचा चमत्कार मोदी काळात घडला आहे”, असा आरोप ठाकरे गटानं केला आहे.
“भ्रष्टाचाराच्या चिखलात संपूर्ण भाजप आज लोळते आहे व स्वतः मोदी, शहा, फडणवीस, हेमंत बिस्व सर्मा, कैलास विजयवर्गीय, महाराष्ट्रात नारायण तातू राणे यांच्या मुलांची भाषणे ऐकली तर चिखलफेक परवडली, ही वरळीची गटारे आवरा, असेच मोदी म्हणतील, पण शेवटी हे सर्व मोदीकृपेनेच सुरू आहे”, असा टोलाही सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.