१ जुलै रोजी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ९० मिनिटांचं भाषण केलं. या भाषणात त्यांनी हिंदुत्व, महात्मा गांधी, संविधान असे सगळेच मुद्दे बाहेर काढले आणि आम्ही घाबरत नाही असं म्हटलं आहे. तसंच भाजपा, मोदी आणि संघा म्हणजे हिंदुत्व नाही असाही टोला राहुल गांधींनी लगावला. हिंदू हिंसक असतात या राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन चांगलाच गदारोळ झालेला पाहण्यास मिळाला आहे. राहुल गांधींच्या भाषणातला काही भाग वगळण्यातही आला आहे. आता उद्धव ठाकरेंनी राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान वगैरे काहीही केलेला नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही असंही म्हटलं आहे.

राहुल गांधींना भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपाला लक्ष्य करत राहुल गांधींनी संसदेत सोमवारी जे भाषण केलं त्या भाषणात हिंदू हिंसक असतात आणि भाजपा, मोदी आणि संघ म्हणजे हिंदू नाहीत असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं. ज्यानंतर संपूर्ण हिंदू समुदायाला तुम्ही हिंसक म्हणू नका असं त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. मात्र राहुल गांधी तातडीने म्हणाले की तुम्ही म्हणजे हिंदू नाही तुम्ही सांगता ते हिंदुत्व नाही. 

राहुल गांधींबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केला का? हिंदुत्वाचा अपमान आमच्यापैकी कुणीही करणार नाही. कुणी सहनही करणार नाही. राहुलजींनी सांगितलं भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही. हे माझंही ठाम मत आहे. की भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही. मी मागेही सांगितलं आहे मी भाजपाला सोडलं आहे हिंदुत्व सोडलेलं नाही. हिंदुत्व सोडणं शक्यच नाही. राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केला नाही. भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही हे त्यांनी ठासून सांगितलं.”

हे पण वाचा- अंबादास दानवेंच्या निलंबनाच्या कारवाईवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “षडयंत्र रचून…”

जय संविधान म्हटल्यावर ज्यांना मिरच्या झोंबल्या

“राहुल गांधींकडून हिंदुत्वाचा अपमान झालेला नाहीच. तसंच लोकसभेत जय संविधान म्हटल्यानंतर काही लोकांना मिरच्या झोंबल्या आहेत. अशा लोकांच्या निषेधाचा ठराव लोकसभेत पाठवला पाहिजे. आम्ही तर त्यांचा निषेध करतोच पण लोकसभेत हा ठरावही पाठवा असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. राहुल गांधी काय चुकीचं बोलले? राहुल गांधी शंकराचं चित्र दाखवू इच्छित होते पण त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. हे काय तुमचं हिंदुत्व आहे का? पंतप्रधान जय श्रीरामचे नारे प्रचार सभांमध्ये देतात ते कसे चालतात? संसदेत भाजपाशिवाय कुणी जय श्रीराम म्हटलं तर तो अपराध आहे का?” असेही सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

भाजपा म्हणजे हिंदुत्व नाहीच

“राहुल गांधींनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही. आज त्याबद्दल फेक नरेटिव्ह भाजपाकडून पसरवलं जातं आहे की भाजपा म्हणजेच हिंदुत्व त्याला काही अर्थ नाही. भाजपा हिंदुत्वाच्या आसपासही नाही. आम्ही म्हणजेच हिंदू असा आभास निर्माण करुन भाजपा लोकांना मूर्ख बनवते आहे.” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.