नवी दिल्ली : देशातील लोकशाही शेवटची घटका मोजू लागली आहे का, असे विचारण्याची वेळ भाजपने आणली आहे. या देशातील लोकशाही वाचली पाहिजे तरच देश वाचेल. त्यामुळे लोकशाही आणि देश टिकवण्याच्या एकमेव उद्देशाने भाजपेतर विरोधक एकत्र आले आहेत, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘इंडिया’च्या बैठकीआधी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
‘इंडिया’च्या दिल्लीतील बैठकीच्या दिवशीच शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून काँग्रेसवर तीव्र टीका करण्यात आली. त्यासंदर्भात, लोकसभा निवडणुकीचे घोडेमैदान जवळ आले आहे, आता सर्वच पक्षांनी तयारीला लागण्याची गरज आहे. त्यापलीकडे कोणताही वेगळा अर्थ नाही, असे ठाकरे म्हणाले.
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने ‘इंडिया’तील घटक पक्षांशी जागावाटप करण्यास नकार दिला होता. काँग्रेसच्या उद्दामपणावर समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष कमालीचे नाराज झाले होते. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनीही टीका केली होती. मात्र, ‘इंडिया’तील नेत्यांमध्ये नाराजी नाही. मी केजरीवाल यांची भेट घेतली असून आमची चर्चा अत्यंत खेळीमेळीत झाली. केजरीवाल नाराज नाहीत. ‘इंडिया’तील कोणत्याही नेत्यामध्ये मतभेद नसल्याचा दावा ठाकरे यांनी केला. मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान यांना बदलले जाऊ शकते, तर, केंद्रात मोदींनाही बदलता येऊ शकेल, असा आशावाद ठाकरेंनी व्यक्त केला.
हेही वाचा >>>इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला का? मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “मोदींना…”
‘इंडिया’च्या महाआघाडीला मोदींच्या समोर ठामपणे उभे राहणारा नेता असायला हवा असे मत ठाकरेंनी व्यक्त केले. हा चेहरा शरद पवार, नितीशकुमार वा तुम्ही स्वत: होऊ शकता, या प्रश्नावर, याबद्दल आत्ता बोलणे योग्य नाही; पण ‘इंडिया’चे नेतृत्व करण्याबाबत कोणत्याही नेत्याच्या डोक्यात हवा गेलेली नाही. देश वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत, असे सांगत नेतृत्वाच्या मुद्दय़ाला त्यांनी बगल दिली. ‘इंडिया’च्या महाआघाडीला निमंत्रक वा समन्वयक असला पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.