एनडीएच्या डिनरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हजेरी लावणार आहेत अशी बातमी समोर येते आहे. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे रवाना झाले आहेत, लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी ही माहिती दिली आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असेच अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी २१ मे म्हणजेच आज एनडीएच्या घटकपक्षांसाठी डिनर अर्थात स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. दरम्यान या डिनरसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर हेदेखील दिल्लीला रवाना झाले आहेत.
दिल्लीत होणाऱ्या डिनरला आणि त्यानंतरच्या बैठकीला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे रवाना झाले आहेत. मागच्या वेळी म्हणजेच २०१४ मध्ये शिवसेनेचे १८ खासदार निवडूनही शिवसेनेला केंद्रात फक्त एक मंत्रिपद मिळालं होतं. यावेळी ही मागणी वाढणार का? शिवसेनेची भूमिका काय असणार या सगळ्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मात्र त्याआधीच एनडीएने आज डिनरचे आयोजन केले आहे. आता भाजपाची ही डिनर डीप्लोमसी कशी आणि किती काम करणार हे पहाणे नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकांच्या निकालाआधी बहुतांश एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा NDA सरकार सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एनडीएच्या सगळ्याच घटकपक्षांच्या नेत्यांना दिल्लीत डिनरसाठी बोलावलं आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर दिल्लीला रवाना झाले आहेत.