भाजपाविरोधी एकत्र येण्याकरता देशभरातील सर्व विरोधी पक्ष आज बिहारच्या पाटण्यात जमले होते. पाटण्यात सर्वपक्षीय विरोधकांची बैठक झाली आहे. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून निवडणुका एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली. बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व नेत्यांनी आपली मते मांडली. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आजच्या बैठकीवरून भाष्य केलं आहे.
हेही वाचा >> विरोधकांची संयुक्त बैठक संपली, नितीश कुमारांनी केली मोठी घोषणा; म्हणाले, “सर्व पक्ष…”
“देशातील सर्व पक्षातील प्रमुख नेते येथे आले आहेत. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्व नेते येथे आले आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे नेते असल्याने आमच्यात मतभेद असतील, पण देश एक आहे. देशाला वाचवण्यासाठी, देशाची एकता आणि अखंडता कामय राखण्यासाठी एकत्र आलो आहोत. जेव्हा केव्हा देशातील स्वातंत्र्यावर आघात केला जाईल तेव्हा आम्ही विरोध करणार आहोत. विरोधकांची एकता होईल की नाही अशी शंका निर्माण केली जाते. पण मी स्वतःला विरोधक मानतच नाही. पण जे देशद्रोही आहेत, जे देशात हुकुमशाही आणू इच्छितात त्याविरोधात आम्ही उभे राहणार आहोत. सुरुवात चांगली झाली की पुढेही सर्व चांगलं होतं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >> Photos : “पाटण्यातून सुरू होणारं जनआंदोलन बनतं”, विरोधकांच्या ऐक्याला बिहारमधून बळकटी; कोण काय म्हणालं वाचा!
प्रत्येक राज्याचा विचार केला जाई – मल्लिकार्जुन खरगे
“सर्व नेते भेटले. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत सर्व नेते आले आहेत. सर्व नेत्यांनी एक होऊन पुढे निवडणूक लढण्यासाठी एक कॉमन अजेंडा तयार करत आहोत. १० किंवा १२ जुलै रोजी शिमल्यामध्ये पुढची बैठक होणार आहे. या बैठकीत अजेडा तयार केला जाईल. कोणत्या मुद्द्यांवर निर्णय घेतला जाईल, पुढे कसं चाललं पाहिजे. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने काम करावं लागणार आहे. कारण एकाच मुद्द्यावर प्रत्येक राज्यात चालून नाही चालणार. बिहार, तामिळनाडू, काश्मीर, महाराष्ट्रात काय करणं गरेजंच आहे याबाबत स्ट्रॅटेजी तयार केली जाईल. एकजूट होऊन २०२४ ची लढाई आपल्याला लढायची आहे. राहुल गांधींनी जिथे जिथे यात्रा केली, तेथील नेते आज आले आहेत”, असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?
आज आपण देशात रोज एक नवीन समस्या पाहत आहोत. ठिकठिकाणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाच्या ऐक्यासाठी आज आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या साथीदारांचा सामना करावा लागणार आहे. आपण एकत्रितपणे त्याचा सामना केला पाहिजे. काही मतभेद असतील किंवा इतर असतील, पण राष्ट्रहितासाठी आम्ही परस्पर समस्यांकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला विश्वास आहे की पाटण्यापासून ही सुरुवात देशात बदल घडवून आणण्यासाठी सुरू झाली आहे, असं शरद पवार म्हणाले.
जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली येथून एक संदेश दिल्याचे मला आठवते. त्यामुळे संपूर्ण देशात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. येथून अनेक चळवळी सुरू झाल्या आणि देशाच्या इतिहासात त्याचा स्वीकार झाला. आजच्या परिस्थितीत नितीशजींनी ही बैठक बोलावली आणि सगळे मित्र इथे आले. बैठकीत झालेल्या चर्चेत एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून आमची नवी वाट दाखवण्याचे काम सुरू झाले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की देशातील जनता त्याला साथ देईल, असंही पवार म्हणाले.