Udhaynidhi Stalin on Tamil Languagae : “जनतेने १६ मुलांचे पालनपोषण करण्याचा विचार करावा”, असा सल्ला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी नवजोडप्यांना दिला. त्यांचं हे विधान चर्चेत असतानाच आता त्यांचा मुलगा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी मुलांची नावे तमिळ भाषेतच ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसंच, तमिळ भाषेवर हिंदी भाषा लदू नका, असा इशाराही त्यांनी दिलाय. हिंदुस्तान टाईम्सने यांसदर्भातील वृत्त दिलं आहे.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार देशात हिंदी लादण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी टीका करत स्टॅलिन यांनी भाजपाशासित केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. त्यामुळे उदयनिधी स्टॅलिन यांनी नवदाम्पत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, नवीन पालकांनी नवी तमिळ नावे शोधली पाहिजेत. कारण अनेकजण तमिळनाडूवर हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदीचं अतिक्रमण तमिळनाडू कधीच स्वीकारणार नाही, असंही स्टॅनिल यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा >> स्टॅलिन यांचेही मोठ्या कुटुंबांसाठी आवाहन; लोकसभा मतदारासंघांच्या परिसीमनाच्या परिणामाविषयी चिंता

उदयनिधी स्टॅलिन तमिळ भाषेबाबत नेमकं काय म्हणाले?

“नवीन पालकांनी चांगली नवी तमिळ नावे शोधली पाहिजेत. कारण, अनेकजण तमिळ भाषेवर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत आहेत. तमिळवर हिंदी भाषा थेट लादता येत नसल्याने ते थाय वाझथू या तमिळ राज्य गीतातील काही शब्द वगळत आहेत. ते नव्या शैक्षणिक धोरणातून राज्यावर हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहेत. तमिळनाडू राज्याचं नाव बदलण्याचाही अनेकांनी प्रयत्न केलाय. परंतु, संपूर्ण राज्याने याला विरोध केल्याने त्यांनी माफी मागितली. आता काहीजण तमिळनाडूच्या राज्य गीतातून द्रविडम हा शब्द वगळण्याचा प्रयत्न करत आहेत. डीएमकेचा शेवटचा वारस जिवंत आहे तोवर तमिळ भाषा जिवंत राहील. तमिळ, तमिळनाडू आणि द्रविडमला कोणी धक्काही लावू शकणार नाही. तमिळनाडू कधीच हिंदी भाषा स्वीकारणार नाही”, असा सज्जड दमच उदयनिधी स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला दिला.

एम. के. स्टॅलिन मुलांना जन्माला घालण्याबाबत काय म्हणाले होते?

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील तरुणांची लोकसंख्या कमी होत असल्याने तरुण दाम्पत्यांना अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केल्यानंतर दोनच दिवसांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी त्यांची री ओढली. लोकसभा मतदारसंघांच्या परिसीमनानंतर दक्षिणेकडील राज्यांच्या कमी लोकसंख्येमुळे संसदेमध्ये कमी प्रतिनिधित्व मिळेल ही भीती व्यक्त करत, ‘‘दाम्पत्यांनी १६ मुले का जन्माला घालू नयेत’,’ असा प्रश्न त्यांनी विनोदाने विचारला. त्यांच्या या वक्तव्याची देशभर चर्चा सुरू असतानाच त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी नवदाम्प्त्यांना आता तमिळ भाषेत नावे ठेवण्याचा सल्ला दिला आहे.