जम्मू-काश्मीरमधील लडाखच्या क्षितिजावर दिसलेले अज्ञात प्रकाशमान पदार्थ म्हणजे चीनने पाठवलेले चिनी कंदील होते, असा सुरक्षा संस्थांचा अंदाज आहे. गेल्या महिन्याच्या सुरूवातीला भारत-तिबेट सीमा पोलिसांनी सरकारला असे कळवले होते की, लेह शहरापासून १६० कि.मी अंतरावर आम्हाला काही प्रकाशमान घटक उडताना दिसले होते. त्यांचा प्रकाश पिवळा व नारिंगी होता. लेह येथील १४ कॉर्पसच्या जवानांना इंडो-तिबेट पोलिस दलाने सतर्क केले होते. उत्तर कमांडचे कार्यालय असलेल्या उधमपूर येथे काही प्रकाशमान पदार्थ त्यांना दिसले होते. विविध संस्थांच्या वैज्ञानिकांना लेह येथे आणून या घटनेचा अभ्यास करण्यात आला. हवाई दलाच्या तज्ज्ञांनी असे सांगितले की, त्या उडत्या पदार्थाकडून रडारला कुठलेच संदेश मिळाले नाहीत कारण ते लेह येथील सरोवराच्या क्षितिजावर होते. ते ४५ कि.मी भारतीय हद्दीत तर ९० कि.मी. चीन हद्दीत होते. त्यानंतर भारतीय लष्कराने त्यातील एक उडता पदार्थ उडवून खाली पाडावा असा प्रस्ताव मांडण्यात आला, कारण यापूर्वी या भागात २९ ऑक्टोबर १९६२ म्हणजे चीन युद्धाच्या काळातच गोळीबाराचे आवाज घुमले होते. चीनचे कंदील हाणून पाडले तर विनाकारण तणाव निर्माण होईल असेही मत व्यक्त करण्यात आले होते.गुप्तचर संस्थांच्या मते या चिनी कंदिलांची संख्या कमी होती, त्यामुळे चीनचे ते मानसिक दडपण आणण्याचे तंत्र असावे. लडाखच्या भारतीय खगोल प्रयोगशाळेचे तज्ज्ञ व वैज्ञानिक यांनी म्हटले आहे की, हे चिनी कंदील १२ ते १८ मिनिटात दिसेनासे झाले. ५०० ते २००० मीटर उंचीवर चिनी कंदील सोडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील अनोळखी प्रदेशात भारतीय सैन्यदलांनी कुठल्याही कारवाया करू नयेत यासाठी त्यांना घाबरून सोडायचे हा त्यामागे चीनचा हेतू असावा असे सांगण्यात आले. इंग्लंडच्या काही अधिकाऱ्यांनी २०१० मध्ये लोकांना विमानतळ व किनारी प्रदेशाच्या आजूबाजूच्या पाच मैल प्रदेशात चिनी कंदील उडवू नयेत असे म्हटले होते. अनेक युरोपीय देशांनी चिनी कंदिलांच्या उत्पादनावर बंदी घातली आहे.

काय असतो चिनी कंदील
चिनी कंदिलात तेलकट राइस पेपर हा बांबूच्या चौकटीवर ताणून बसवला जातो व त्याला इंधन घट म्हणजे फ्युएल सेल असतो. तो मेणासारख्या ज्वालाग्राही पदार्थाचा बनवलेला असतो. यात ज्योतीमुळे कंदिलातील हवा तापते व त्यामुळे तो हवेत उडू शकतो. ही ज्योत तेवते तोपर्यंत तो आकाशात उडत राहतो व नंतर खाली कोसळतो. चिनी कंदिलाचा वापर तिसऱ्या शतकात झुगे लियांग यांनी शत्रूशी लढताना मित्रांची मदत मिळावी यासाठी युद्धभूमीवर केला होता.

Story img Loader