UGC NET Exam 2024 Update : मंगळवारी ( १८ जून रोजी ) झालेली यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा पुन्हा एकदा नव्याने घेतली जाणार आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने परिपत्रक काढत यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. पेपर फुटल्याचा संशय असल्याने तसेच या परीक्षेची पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचं शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच ही परीक्षा पुन्हा नव्याने घेतली जाणार आहे. नव्याने घेतली जाणारी ही परीक्षा नेमकी कधी होईल, यासंदर्भात लवकर निर्णय जाहीर करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. याबरोबरच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला असून पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असंही शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. याप्रकरणात जी कुणी व्यक्ती दोषी असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही शिक्षण मंत्रालयाने स्ष्ट केलं आहे.

दरम्यान, मंगळवारी १८ जून रोजी देशातील विविध शहरांमध्ये १२०० पेक्षा जास्त केंद्रावर दोन टप्प्यांत ही परीक्षा घेण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.