विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) ने काही दिवसांपूर्वी पत्रक काढून देशभरातील महाविद्यालयांमध्ये सेल्फी पॉईंट उभारण्याचे निर्देश दिले होते. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार आक्षेप घेतला. “यूजीसी ही स्वतंत्र संस्था आहे. युजीसीने महाविद्यालयांमध्ये सेल्फी पॉईंट उभारण्याचे निर्देश दिले. पण महाविद्यालयात सेल्फी पॉईंट बनविण्याची आहे काय गरज? आम्ही आमच्या मुलांना महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी पाठवतो. सेल्फी काढण्यासाठी नाही”, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी यूजीसीच्या निर्णयावर टीका केली. लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज (६ डिसेंबर) “केंद्रीय विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२३” या विधेयकावर चर्चा करत असताना सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा मांडला.
यूजीसीने निर्देश दिल्याप्रमाणे भारतातील महाविद्यालयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसह सेल्फी घेण्याचे पाईंट उभारावेत. बॅकग्राऊंडला मोदींचा फोटो असल्यास विद्यार्थ्यांना त्याठिकाणी सेल्फी घेता येईल. यावर आक्षेप घेताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “यूजीसी ही संस्था आमच्या देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य ठरविणारी संस्था आहे. यूजीसीने हा निर्णय का घेतला? यामागचे कारण समजत नाही. तसेच मोदी हे फक्त एक पक्षाचे नाही, तर माझेही पंतप्रधान आहेत. पण आम्ही मुलांना महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी पाठवतो, सेल्फी घेण्यासाठी नाही. या विषयाकडे राजकारण म्हणून पाहू नका.”
यावेळी लोकसभा सभागृहात उपस्थित असलेले केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार म्हणाले की, महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान मोदींचा फोटोंसह विद्यार्थ्यांना सेल्फी काढण्याची परवानगी दिल्यास त्यांच्यात एक नवा उत्साह निर्माण होईल. तसेच केंद्र सरकारने आखलेली विकसित भारत संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकते. सुभाष सरकार यांच्या या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला.
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर सभागृहात गदारोळ माजला. भाजपाच्या खासदारांनी सुळे यांच्या भाषणादरम्यान गोंधळ घातला. खासदार राजीव प्रताप रुडी म्हणाले की, महाविद्यालयातील विद्यार्थी जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेसह सेल्फी घेणार असतील तर विरोधकांना काय अडचण आहे? अशा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपाच्या खासदारांनी सुप्रिया सुळे यांच्या भाषणात अडथळा निर्माण करून त्यांना बोलू न देण्याची विनंती अध्यक्षांकडे केली. पीठासीन अधिकारी रीमा देवी यांनी सुप्रिया सुळेंना थोडक्यात त्यांचे म्हणणे मांडण्याची मुभा दिली. यावर सुळे म्हणाल्या की, शिक्षण हे सर्वसमावेश असावे, अशी माझी भूमिका आहे.
खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, शिक्षण मंत्र्यांनी जोतीराव फुले यांचा उल्लेख केल्याची आठवण करून देत फुले हे महाराष्ट्रातील आहेत, याचा मला अभिमान वाटतो, असेही त्या म्हणाल्या. मी माझ्या पालकांची एकुलती एक मुलगी आहे. मी एका उदार कुटुंबातून दुसऱ्या एका उदारमतवादी कुटुंबात लग्न करून गेली. यावेळी फुले यांच्या “विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली” हा विचार उद्धृत केला. फुले यांच्या या विचाराप्रमाणे शिक्षण नीती असावी, अशी विनंती केली.