UK General Election 2024 Result : ब्रिटनमध्ये १४ वर्षांनंतर सत्तांतर घडले आहे. मजूर पक्षाने ब्रिटनमध्ये ऋषी सुनक यांच्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला धूळ चारली आहे. ऋषी सुनक यांनी मुदत संपण्यापूर्वीच निवडणूक झाली जाहीर केली होती. परंतु, त्यांना या निवडणुकीत पक्षाला जिंकवता आले नाही. मजूर पक्षाने अभुतपूर्व यश मिळवले असून ४०० पार जागा ताब्यात घेतल्या आहेत. युके सीनबीके या वृत्तस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, मजूर पक्षाने ४१० जागा जिंकल्या आबेत.

६५० सदस्यांच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मजूर पक्षाने ४०० पेक्षा जास्त जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मतदानपूर्व तसेच मतदानोत्तर चाचण्यांमध्ये मजूर पक्षाचीच सत्ता येण्याबाबतचे कल स्पष्ट झाले होते. कीर स्टार्मर हे मजूर पक्षाचे सातवे पंतप्रधान ठरणार आहेत.

हेही वाचा >> विश्लेषण: ब्रिटनमध्ये ऋषी सुनक आणि हुजूर पक्षाचा ऐतिहासिक, दारूण पराभव… मजूर पक्षाच्या अभूतपूर्व विजयाची कारणे कोणती?

शुक्रवारी पहाटे मजूर पक्षाने बहुमताची संख्या पार केली. त्यामुळे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी जनतेची माफी मागत पराभव स्वीकारला. तर, मजूर पक्षाचे अध्यक्ष कीर स्टार्मर हे देशाचे नवे पंतप्रधान होण्यास सज्ज झाले आहेत. देशात आता बदलाला सुरुवात होईल, असं ते म्हणाले. “आम्ही करून दाखवलं”, असं म्हणत कीर म्हणाले, “तुम्ही केलेला प्रचार, तुमची लढाई यामुळे हे सिद्ध झालं आहे. आता बदलाला सुरुवात होईल.”

आतापर्यंत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या

  • मजूर पक्ष – ४१०
  • कन्झर्व्हेटिव्ह – १२०
  • लीब डम – ७१
  • एसएनपी – ९
  • अपक्ष – ३५

आजवरचा सर्वांत वाईट निकाल…

गेल्या पाच वर्षांत अनेक नकोसे विक्रम नोंदविणाऱ्या हुजूर पक्षाने निवडणुकीतही आतापर्यंतच्या सर्वांत वाईट पराभवाची नोंद केली आहे. ६५० सदस्यांच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मजूर पक्षाने ४००पेक्षा जास्त जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. टेन, डाऊनिंग स्ट्रीट या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानातून भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना गाशा गुंडाळावा लागणार असून मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टार्मर ब्रिटनचे पुढले पंतप्रधान असतील, हे निश्चित झाले आहे. हुजूर पक्षाची कामगिरी काही मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तविलेल्या अंदाजांइतकी खराब झाली नसली, तरी तब्बल २१८ सदस्य गमावत आजवरच्या सर्वांत मोठ्या पराभवाची नोंद पक्षाने केली आहे. स्टार्मर यांनी हुजुर पक्षाची १४ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली असली, तरी १९९७ साली त्यांच्या पक्षाचे नेते टोनी ब्लेअर यांचा विक्रम (४१८ जागा) मोडण्याची त्यांची संधी थोडक्यात हुकली आहे.