UK General Election 2024 Result : युकेमध्ये विरोधी बाकावर असलेल्या मजूर पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत मोठी झेप घेतली आहे. ४०० हून अधिक जागांवर विजय प्राप्त करून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. तर, गेल्या १४ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या हुजूर पक्षाला म्हणजे कॉन्झव्हेर्टिव्ह पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. जनतेने दिलेला कौल मान्य करून हुजूर पक्षाचे अध्यक्ष ऋषी सुनक यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त यु.के. सीएनबीसी वृत्तस्थळाने दिलं आहे.

“देशाला मी प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे सांगू इच्छितो की मला माफ करा. मी माझ्या या कामासाठी माझे सर्वस्व दिले आहे, परंतु तुम्ही स्पष्ट संकेत पाठवले आहेत की युनायटेड किंगडमचे सरकार बदलले पाहिजे आणि तुमचाच निर्णय महत्त्वाचा आहे. या नुकसानीची जबाबदारी मी घेतो. या निकालानंतर मी पक्षाचे नेतेपद सोडत आहे”, असं ऋषी सुनक म्हणाले.

पंतप्रधान म्हणून आपल्या शेवटच्या भाषणात, ऋषी सुनक म्हणाले की, माझ्या हातात सत्ता आल्यानंतर मी आर्थिक सुधारणांवर भर दिला, देशाचा आर्थिक दृष्टीकोन या पक्षासाठी महत्त्वाचा होता. जेव्हा मी पहिल्यांदा येथे तुमचा पंतप्रधान म्हणून उभा राहिलो, तेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की माझ्याकडे असलेले सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे आमच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता आणणे. महागाई पुन्हा वाढली आली आहे, तारण दर घसरले आहेत”, सुनक म्हणाले.

हेही वाचा >> UK Election Result 2024 : अबकी बार ४०० पार! मजूर पक्षाची मोठी झेप, ऋषक सुनक यांच्या पक्षाला किती जागा?

“परंतु, माझा विश्वास आहे की हा देश २० महिन्यांपूर्वीच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि मजबूत आहे. तसंच २०१० च्या तुलनेत अधिक समृद्ध, सुंदर आणि लवचिक आहे”, असंही सुनक यांनी शुक्रवारी सांगितले.

कीर स्टार्मर होणार नवे पंतप्रधान

६५० सदस्यांच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मजूर पक्षाने ४०० पेक्षा जास्त जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मतदानपूर्व तसेच मतदानोत्तर चाचण्यांमध्ये मजूर पक्षाचीच सत्ता येण्याबाबतचे कल स्पष्ट झाले होते. कीर स्टार्मर हे मजूर पक्षाचे सातवे पंतप्रधान होणार आहेत.