ब्रिटिश संसदेच्या निवडणुकीत अनेक भारतीय वंशाचे उमेदवार निवडून आले आहेत. यात कीथ वाझ, प्रीती पटेल आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई इत्यादींचा समावेश आहे.
वीस वर्षीय मेरी ब्लॅक ब्रिटनची सर्वात तरुण संसदपटू
मजूर पक्षाचे अनेक वर्षांपासून खासदार असलेले कीथ वाझ (लेसिस्टर पूर्व) आणि वीरेंद्र शर्मा (ईलिंग साऊथऑल) यांना त्यांच्या मतदारसंघांतील भारतीय वंशाच्या मतदारांशी असलेल्या जवळिकीचा फायदा मिळून ते पुन्हा निवडून आले.
सत्ताधारी हुजूर पक्षातील भारतीय वंशाच्या दिग्गज आणि पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या विश्वासू प्रीती पटेल यांनीही ४१.५ टक्के  बहुमतासह त्यांची विथमची जागा कायम राखली.
विरोधी मजूर पक्षाचे व्हॅलेरी वाझ यांनीही त्यांची वॉल्सऑल दक्षिणची जागा कायम राखली, तर सीमा मल्होत्रा या दक्षिण लंडनच्या जागेवर सहज विजयी झाल्या.
इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक यांनी रिचमंड (यॉर्क्स) येथून टोरी पक्षातर्फे लढून तब्बल ५१.४ टक्के बहुमतासह विजय मिळवला. माझ्या पालकांना स्थानिक समुदायाची निष्ठेने सेवा करताना पहात मी मोठा झाला. माझे वडील राष्ट्रीय आरोग्य सेवेचे फॅमिली डॉक्टर असून आई औषधांचे दुकान चालवते, असे त्यांनी सांगितले.
मात्र टोरी पक्षाच्या सर्वच भारतीय वंशाच्या उमेदवारांना यश मिळाले नाही. पॉल उप्पल हे मजूर पक्षाच्या प्रतिस्पध्र्याशी हरले. याच वोलव्हरहॅम्प्टन परगण्यात अरुण व सुरिया फोटे हे भाऊ-बहीण पहिल्यांदाच लढून पराभूत झाले.
भारतीय वंशाचे किती खासदार नव्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून आले, हे सर्व जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर स्पष्ट  होईल. २०१०च्या सार्वत्रिक निवडणुकीत आतापर्यंतचे सर्वाधिक, म्हणजे आठ भारतीय वंशाचे खासदार निवडून आले होते. २०१५च्या निवडणुकीत विविध पक्षांकडून मिळून भारतीय वंशाचे एकूण ५९ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते.

 

Story img Loader