ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या ‘१० डाऊनिंग स्ट्रीट’ येथील बागेत ठेवण्यात आलेल्या तांब्याच्या शिल्पावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. एका प्रसिद्ध ब्रिटिश कलाकाराचे हे शिल्प ब्रिटन सरकारने करदात्यांचे १३ कोटी खर्चून विकत घेतले आहे. ‘द सन’च्या वृत्तानुसार प्रसिद्ध कलाकार हेन्री मोर यांच्या “वर्किंग मॉडेल फॉर सीटेड वुमन” या १९८० मधील शिल्पाचा लिलाव करण्यात आला. हे शिल्प गेल्या महिन्यात ब्रिटन सरकारच्या कला संग्रह विभागाने खरेदी केले आहे.
या शिल्पावरुन ब्रिटन सरकारवर टीकेची झोड उठली आहे. देशातील नागरिक वाढती महागाई, घरगुती बिलांचे वाढलेले दर आणि खर्च कपातीशीची झगडत असताना या शिल्पावरील खर्चावरुन सरकारला लक्ष्य केले जात आहे. “हे हेन्री मोर यांचं अत्यंत उत्तम शिल्प आहे. मात्र, देशातील आर्थिक वातावरण पाहता सार्वजनिक निधीचा हा अवाजवी वापर आहे”, अशी टीका तज्ज्ञांकडून केली जात आहे.
प्रसूती आणि गर्भधारणेची तीव्र भावना व्यक्त करणारी ही कलाकृती असल्याची माहिती ‘क्रिस्टी’च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. दरम्यान, ‘डाऊनिंग स्ट्रीट’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, या शिल्प खरेदीत कोणत्याही राजकारण्याचा सहभाग नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ब्रिटन सरकारच्या मालकीच्या कला संग्रहात जवळपास १४ हजार मौल्यवान कलाकृती आहेत. या कलाकृती लंडनमधील व्हाईटहॉल आणि इतर आस्थापनांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. हेन्री मोर हे २० व्या शतकातील प्रसिद्ध ब्रिटिश शिल्पकार होते. त्यांचा १९८६ मध्ये मृत्यू झाला.