इंग्लंडच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी लंडनच्या ‘द टाइम्स’ या वृत्तपत्रात लेख लिहून लंडनची पोलीस यंत्रणा पॅलेस्टाईन धार्जिणी आहे, असा आरोप केला. तसंच पोलीस यंत्रणेला कायदा सुव्यवस्थेची चिंता नाही, असाही दावा केला. यानंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सुएला ब्रेव्हरमन यांची गृहमंत्रीपदावरुन हकालपट्टी केली. यानंतर परराष्ट्र जेम्स क्लेव्हर्ली यांच्या खात्यात बदल करून त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. गृहमंत्रीपदावर येताच क्लेव्हर्ली यांनी एक व्हिडीओ शेअर करत हमासवर मोठं विधान केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेम्स क्लेव्हर्ली यांनी इंग्लंडमधील मजुर पक्षाचे माजी नेते जेरमी कॉर्बिन यांचा पत्रकार पियर्स मॉर्गन यांच्या चर्चा सत्रातील एक व्हिडीओ पोस्ट केला. यात पत्रकार पियर्स मॉर्गन आक्रमकपणे कॉर्बिन यांनी हमास दहशतवादी संघटना आहे की नाही असं विचारताना दिसत आहेत. या प्रश्नावर कॉर्बिन यांनी थेट उत्तर न देता त्या मुद्द्यावर तपशीलवार आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पत्रकार मॉर्गन यांनी कॉर्बिन यांचं बोलणं मध्येच थांबवत हो की नाही यात उत्तर देण्याची आक्रमक भूमिका घेतली.

गृहमंत्री क्लेव्हर्ली यांनी हाच व्हिडीओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. तसेच मी इंग्लंडचा गृहमंत्री म्हणून सांगतो की, हो हमास दहशतवादी संघटना आहे, अशी जाहीर भूमिका घेतली.

गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्याचं नेमकं प्रकरण काय?

११ नोव्हेंबर हा दिवस युरोपात महत्त्वाचा मानला जातो. १९१९ मध्ये याच दिवशी पहिलं महायुद्ध संपलं होतं. त्या वर्षापासूनच लंडनमध्ये या युद्धात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून साजरा होतो. तसंच शासकीय समारंभही आयोजित केले जातात. शंभरहून अधिक वर्षे ही परंपरा सुरु आहे. याच दिवशी लंडनमध्ये पॅलेस्टाईन समर्थकांचा मेळावा होता. ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन या इस्रायल समर्थक आहेत. त्यामुळे त्यांना हा मेळावा पटला नाही.

हेही वाचा : ब्रिटनच्या गृहमंत्रीपदावरून सुएला ब्रेव्हरमन यांना डच्चू ;माजी पंतप्रधान कॅमेरून नवे परराष्ट्रमंत्री

या मेळाव्याची संमती मागण्यासाठी आलेल्या आयोजकांना गृहमंत्री ब्रेव्हरमन यांचं मत काय आहे? हे विचारात न घेता पोलिसांनी संमती दिली. हुतात्मा दिवसाला गालबोट लागणार नाही आणि शासकीय कार्यक्रमांच्या मध्ये या मेळाव्यामुळे बाधा येणार नाही याची काळजी घ्या अशा दोन अटी घालून पोलिसांनी ही परवानगी दिली. मात्र सुएला ब्रेव्हरमन यांना हे मुळीच आवडले नाही. त्यांनी लंडन पोलीस प्रमुखांना बोलवलं आणि या मेळाव्याला संमती देऊ नये असं सुचवलं.

हेही वाचा : सुएला ब्रेव्हरमन यांची गृहमंत्री पदावरुन हकालपट्टी, पंतप्रधान कार्यालयाची अवहेलना पडली महागात

यावर पोलीस प्रमुखांनी विनम्र नकार देत ही संमती रद्द करण्यासाठी काहीही सबळ कारण नाही असं सांगितलं. नियम पाळून हा मोर्चा काढला जाईल असंही सांगितलं. यानंतर चिडलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांनी द टाइम्समध्ये लेख लिहिला. ज्यानंतर आता त्यांना गृहमंत्री पदावरुन हटवण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uk home secy james cleverly comment on is hamas a terror group pbs