ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या अडचणींणध्ये भर पडली आहे कारण त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पार्लमेंट कमिशन फॉर स्टँडर्ड्स द्वारे त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे प्रकरण ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्याशी संबंधित आहे. अक्षता मूर्ती या एका चाइल्ड केअर फर्ममध्ये गुंतवणूकदार आहेत. या कंपनीत सुनक यांनी पत्नीची भागिदारी योग्य पद्धतीने जाहीर केली आहे की ती करत असताना नियमांचं उल्लंघन केलं आहे? या संदर्भातली ही चौकशी आहे.
पार्लमेंट कमिश्नरच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार १३ एप्रिलपासून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आयुक्त डॅनियल ग्रीनबर्ग यांनी ही चौकशी सुरू केली आहे. या चौकशीमुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं असून त्यांनी यावर राजकारण तापवण्यास सुरूवात केली आहे. विरोधी पक्षाचा हा आरोप आहे की सुनक यांनी त्यांच्या पत्नी अक्षता यांची कंपनीत असलेली पार्टनरशिप जाहीर केलेली नाही. खासदार म्हणून ती जाहीर करणं ही सुनक यांची जबाबदारी होती असंही विरोधकांनी म्हटलं आहे.
ऋषी सुनक यांच्या प्रवक्त्यांनी काय म्हटलं आहे?
ऋषी सुनक यांचे प्रवक्तेही म्हणाले आहेत की अक्षता मूर्ती यांच्या भागिदारी प्रकरणात सुनक यांची चौकशी सुरू आहे. सुनक या चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहेत. आयुक्तांना चौकशीनंतर काही तक्रारी नसतील याची काळजी आम्ही घेत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. १० डाऊनिंग स्ट्रिटचे सर्वात श्रीमंत रहिवासी म्हणून ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी ओळखल्या जातात. सुनक यांच्या पत्नी अक्षता या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत.
ऋषी सुनक जर चौकशीत दोषी आढळले तर त्यांना माफी मागावी लागू शकते. तसंच त्यांच्या विरोधात कारवाई होऊ शकते.