इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेतील युद्धाचा आज १३ वा दिवस आहे. या १३ दिवसांमध्ये इस्रायल आणि गाझा पट्टीतल्या हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. या युद्धामुळे जगाची दोन गटांमध्ये विभागणी झाली आहे. काही राष्ट्रं इस्रायलच्या समर्थनात उभी आहेत, तर काही देशांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. अशातच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी (१८ ऑक्टोबर) इस्रायलचा दौरा करून या युद्धात आपण इस्रायलच्या बाजूने उभे आहोत असा संदेश जगाला दिला. तसेच, गाझा पट्टीतली परिस्थिती सुधारावी यासाठी मध्यस्थी केली. त्यापाठोपाठ आज युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत.
इस्रायलमध्ये पोहोचताच ऋषी सुनक म्हणाले, आम्ही इस्रायलबरोबर उभे आहोत. सुनक यांच्यासह जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, सुनक यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, मी इस्रायलमध्ये आहे. हे राष्ट्र शोकसागरात बुडालं आहे. मीसुद्धा तुमच्या दुःखात सहभागी आहे. दहशतवादाविरोधात मी तुमच्याबरोबर उभा आहे, यापुढेही मी तुमच्याबरोबर असेन.
ऋषी सुनक इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना भेटणार आहेत. ब्रिटीश पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये गाझा पट्टी आणि इस्रायलमधील संपूर्ण परिस्थितीवर चर्चा होईल. इस्रायलच्या भूमीवरून ऋषी सुनक दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतील. तसेच या युद्धात जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहतील. या युद्धामुळे सामान्य नागरिकाचा मृत्यू होणं ही मोठी हानी आहे, यावर ऋषी सुनक भाष्य करतील, असं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे.
हे ही वाचा >> पॅलेस्टाईनचे मुस्लिम भारतीय ध्वज घेऊन पळतानाचा Video चर्चेत! कारण ऐकून व्हाल थक्क, काय आहे खरी बाजू
गाझामधल्या रुग्णालयावरील हल्ल्याचा उल्लेख करत ऋषी सुनक म्हणाले, जगातला संघर्ष वाढण्यापासून रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय नेत्यांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. गाझामधील नागरिकांना मानवतावादी मदत पोहोचवण्याचं काम लवकरच सुरू होणार आहे. सुनक हे मानवतावाद मदत कॉरिडोर लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी नेतान्याहू यांच्याकडे आग्रह धरतील.