ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर करोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचे आरोप केले जात आहे. जॉन्सन यांनी सन २०२० मध्ये करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये डाउनिंग स्ट्रीटच्या गार्डनमध्ये आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत पार्टी केल्याचा दावा ब्रिटनमधील आयटीव्हीने केलाय. एकीकडे नागरिकांना घरांमधून बाहेर निघण्यावरही निर्बंध लादणाऱ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली असतानाच दुसरीकडे पंतप्रधान मात्र पार्टी करत होते असं या वृत्तात म्हटलंय. या पार्टीच्या आमंत्रण पत्रिकांचा ईमेलच समोर आला असून मे २०२० मध्ये पंतप्रधानांच्या डाउनिंग स्ट्रीट कार्यालय आणि सरकारी निवासस्थानी ‘सोशली डिस्टन्स ड्रिंक्स’ नावाखाली पार्टीचं आयोजन करण्यात येत असल्याचे ईमेल या वृत्तवाहिनीने समोर आणलेत. या प्रकरणानंतर आता विरोधी पक्षाने पोलीस तपासाची मागणी केलीय.
पंतप्रधानांचे खासगी सचिव मार्टिन रेनॉल्ड्स यांनी अनेकांना ईमेल पाठवून ही माहिती दिली होती. ही पार्टी २० मे २०२० रोजी झाली. याच दिवाशी झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये लोकांना करोना निर्बंधांची आठवण करुन देताना सरकारी यंत्रणांनी घराचा सदस्य नसणाऱ्या केवळ एकाच व्यक्तीला भेटण्याची परवानगी नवीन नियमांनुसार देण्यात आली आहे, अशी आठवण करुन दिली होती. लंडन पोलिसांनी याच दिवशी करोना निर्बंधांची नवीन नियमावली जारी केली होती. मार्च २०२० पासून सुरु झालेल्या लॉकडाउनमध्ये अंत्यसंस्कार आणि काही महत्वाची कामं वगळता इतर ठिकाणी लोकांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आलेली. याच कालावधीमध्ये पंतप्रधानांनी या पार्टीचं आयोजन केलं होतं. ही पार्टी ‘ब्रिंग युआर ओन बुझ’ म्हणजेच ‘स्वत:च स्वत:च्या पसंतीची दारु घेऊन पार्टीला यावे’ या पद्धतीने आयोजित करण्यात आलेली.
जॉन्सन यांच्या कन्झर्व्हेटीव्ह सरकारवर आरोप करण्यात आला आहे की त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं. इतरांवर लागू केलेले निर्बंध सरकारने पाळले नाहीत असं विरोधकांचं म्हणणं आहे. वरिष्ठ अधिकारी सुए ग्रे यांना यापूर्वी सरकावर करण्यात आलेल्या करोना नियमांच्या उल्लंघनांच्या आरोपांचा तपास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांच्याकडेच नुकत्याच करण्यात आलेल्या आरोपांच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केवळ २० मे २०२० चीच पार्टी नाही तर २०२० मध्ये नाताळाच्या पार्ट्याही आयोजित करण्यात आल्याचे आरोप केले जात आहेत.
जॉन्सन यांनी व्यक्तीगत स्तरावर कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलं नाही. मात्र बीबीसी आणि अन्य वृत्तवाहिन्यांनी मंगळवारी जारी केलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान आणि त्यांची पत्नी कॅरी जॉन्सन यांनी मे २०२० मध्ये गार्डन पार्टीला हजेरी लावली होती. आरोग्य मंत्री एडवर्ड अर्गर यांनी लोकांची नाराजी आम्ही समजू शकतो. पण तपास होण्याआधीच काही निष्कर्ष लावणं चुकीचं ठरेल, असंही अर्गर म्हणालेत. लेबर पक्षाचे खासदार एड मिलीबँड यांनी, करण्यात आलेले आरोप गंभीर असून पंतप्रधान या पार्टीला होते की नाही ते त्यांनी स्वत: स्पष्ट केलं पाहिजे अशी मागणी केलीय.