Wales Burglary: चोरानं घरफोडी केलं, दरोडा टाकला, घर लुटलं… अशा आशयाच्या बातम्या आपण नेहमी ऐकल्या, वाचल्या असतील. घरात चोर शिरल्यानंतर एसीच्या थंड हवेत झोपी गेला किंवा जेवण बनवून खाल्लं, अशाही घटना घडलेल्या आहेत. पण वेल्स देशात एक अजब घटना घडली आहे. वेल्सच्या मॉनमाउथशायर शहरात एकटी महिला राहणाऱ्या घरात एक चोर शिरला आणि भलतंच काम करून निघून गेला. तसंच त्याने घराच्या मालकीनीसाठी एक चिठ्ठीही सोडली. ज्यामुळे सदर महिला चोर पकडला जाईपर्यंत धक्क्यात होती. अखेर या चोराला पकडल्यानंतर तिनं सुटकेचा निःश्वास सोडला.
डॅमियन (३६) असं चोराचं नाव आहे. त्यानं केलेली घरफोडी आता जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. याबद्दल त्याला आता २२ महिन्यांची शिक्षा देण्यात आल्याची बातमी बीबीसीनं दिली आहे. या चोराला शिक्षा झाल्यानंतर ज्या घरात घरफोडी झाली, त्या महिलेनं सांगितलं की, चोरी झाल्यानंतर चोर पकडला जाईपर्यंत मला खूप भीती वाटत होती. मी तणावात होते, अशी अनामिक भीती याआधी मी कधीच अनुभवली नव्हती.
हे वाचा >> ‘ऋषभ पंतच्या त्या चलाखीमुळं टी२० विश्वचषक जिंकलो’, तीन महिन्यांनंतर रोहित शर्माचा मोठा खुलासा
नेमकं चोरानं केलं काय?
डॅमियन या चोरानं चोरीच्या उद्देशानं महिलेच्या घरात प्रवेश केला. तेव्हा सदर महिला ऑफिसला गेली होती. पण घराची अवस्था पाहून डॅमियननं चक्क घरात साफ-सफाई केली. त्यानं कचऱ्याचा डबा मोकळा केला. घरात स्वच्छता केली. भांडी घासून ठेवली. महिलेनं आणलेला किराणा माल पिशव्यातून काढला. काही सामान फ्रिजमध्ये ठेवलं. तसंच फ्रिजमधलं सामानही त्यानं व्यवस्थित लावून ठेवलं. घरातील पाळीव पक्ष्यांना त्यानं दाणे टाकले. झाडं लावलेली भांडी स्वच्छ केली. फरशीही पुसली, वाईनच्या मोकळ्या बाटल्या किचनमधून काढल्या आणि धुतलेले कपडे बाहेर जाऊन वाळत घातले.
चिठ्ठीत काय लिहिलं होतं?
घरातून बाहेर पडण्यापूर्वी डॅमियननं किचनमधलं सामान वापरून जेवणही बनवलं. जेव्हा महिला कामावरून घरी आली, तेव्हा तिला धक्का बसला. घरात सर्व काही नीटनेटकं होतं. किचनमध्ये जेवण तयार करून ठेवलेलं होतं. रेड वाइनची बाटली, ग्लास आणि ओपनर बाहेर काढून ठेवलेलं होतं. तसेच एका वाटीत गोड पदार्थ काढून ठेवलेला होता. तसेच एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ज्यात लिहिलं होतं, “चिंता करू नको, आनंदी रहा आणि जेवण करून घे”
हे ही वाचा >> पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
महिलेनं शेजाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून तिच्या घरात कुणी आलं होतं का? याची विचारणा केली. तेव्हा कुणीतरी बाहेर कपडे वाळत घालताना दिसलं, असं शेजाऱ्यांनी सांगितलं.
असा पडकला गेला चोर
डॅमियननं काही दिवसांन दुसऱ्या एका घरात शिरला असताना त्याला पोलिसांनी पकडलं. घरमालकाला त्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घरात चोर शिरल्याचं लक्षात आल्यानंतर त्यानं पोलिसांना कळवलं. याही घरात त्यानं काहीच चोरी केली नव्हती. उलट इथे येऊन त्यानं स्वतःचे कपडे धुवून घेतले. आंघोळ केली आणि घरातील मद्य रिचवलं.
पोलिसांनी सांगितलं की, डॅमियन बेघर आहे. बेघर असल्यामुळे त्याने अनेक अडचणींचा सामना केला होता. न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर बेकायदेशीरपणे घरात शिरण्याच्या गुन्ह्यात त्याला २२ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली.