रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेलं युद्ध अद्याप थांबायचं नाव घेत नाहीये. युक्रेनकडून जगभरातील इतर देशांना मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला गंभीर इशारा दिला असून “त्यांच्यावर कोणतं संकट येऊ घातलेलं आहे, याची त्यांना कल्पनाही नाही”, अशा शब्दांत जो बायडेन यांनी आपली भूमिका मांडली आहे.
रशियन सैन्यानं युक्रेनची राजधानी किव्हला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. किव्हमधील अनेक इमारतींवर रॉकेट्सने हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी बुधवारी युरोपियन संसदेसमोर केलेल्या भाषणात जगासमोर मदतीची विनंती केली आहे. “आम्ही मजबूत आहोत. आम्ही स्वातंत्र्यासाठी, जिवंत राहण्यासाठी लढत आहोत. तुम्ही सिद्ध करा की आम्हाला एकटं सोडणार नाही”, असं आवाहन त्यांनी युरोपियन संसदेसमोर केलं. त्यांच्या भाषणावर संसदेमध्ये स्टँडिंग ओवेशनने दाद देण्यात आली.
“प्रत्येक इंच जमिनीचं रक्षण करू”
युरोपियन संसदेनं युक्रेनला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता अमेरिकेनं देखील रशियाला गंभीर इशारा दिला आहे. स्टेट ऑफ युनियनसमोर स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री उशीरा जो बायडेन यांनी केलेल्या भाषणात अमेरिकेची नेमकी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. “रशियाने पुकारलेल्या या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. अमेरिका आणि नाटो देश युक्रेनच्या एक-एक इंच जमिनीचं रक्षण करतील. पुतिन यांनी सध्या युद्धाच्या मैदानावर आघाडी मिळवली असली तरी त्यांना याची किंमत चुकवावी लागेल. पुतिन हे हुकुमशहा असून ही लढाई हुकुमशहा विरुद्ध स्वातंत्र्य अशी आहे”, असं बायडेन म्हणाले.
मोठ्या निर्णयाची घोषणा
यावेळी रशियाला आवर घालण्यासाठी अमेरिकेनं मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. “त्यांच्यासमोर आता मोठं संकट उभं राहणार आहे. त्यांना अजिबात कल्पना नाही की कोणतं संकट त्यांच्यावर येऊ घातलं आहे. आज मी ही घोषणा करतो की आम्ही आमच्या मित्र देशांसमवेत मिळून रशियाच्या कोणत्याही प्रकारच्या विमानांसाठी आमची हवाई हद्द पूर्णपणे बंद करतोय”, असं जो बायडेन म्हणाले.
रशियाविरोधात थेट लढणार नाही!
दरम्यान, अमेरिकेचं सैन्य रशियाविरोधात थेट लढणार नसल्याचं देखील जो बायडेन यांनी स्पष्ट केलं आहे. “आमचं सैन्य युरोपमध्ये युक्रेनच्या बाजूने रशियाच्या विरोधात लढण्यासाठी जाणार नाही. मात्र, नाटो देशांच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठीच आम्ही आमचं भूदल, नौदल आणि हवाईदल सज्ज ठेवलं आहे. पोलंड, रोमेनिया, इस्टोनिया या देशांच्या सुरक्षेसाठी आम्ही आमच्या फौजा सज्ज ठेवल्या आहेत. मी आज हे स्पष्ट करू इच्छितो की अमेरिका प्रत्येक नाटो देशाच्या इंच-इंच भूमीचं रक्षण करेल”, असं जो बायडेन यावेळी म्हणाले.
एक अब्ज डॉलर्सची मदत
अमेरिका आणि नाटो देश युक्रेनला १ अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत करणार असल्याचं बायडेन यांनी जाहीर केलंय. आमचं लष्कर युक्रेनमध्ये प्रत्यक्ष युद्धात कोणतीही ढवळाढवळ करणार नाही. मात्र इतर मार्गांनी आम्ही युक्रेनला शक्य ती सर्व मदत करणार आहोत. रशियापासून धोका असू शकतो अशी शक्यता असणाऱ्या भागांमध्ये नाटोच्या सैन्याला तैनात करण्यात आलंय, असंही बायडेन यांनी स्पष्ट केलं.