Russia Missile Attack on Indian Pharma Firm’s Warehouse : युक्रेनमधील भारतीय औषध कंपनी कुसुमच्या गोदामावर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. भारतीय व्यवसायांना जाणूनबुजून लक्ष्य केल्याचा दावाही त्यांच्याकडून करण्यात येतोय. युक्रेनममधील भारतीय दुतावासाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

युक्रेनमधील भारतीय दुतावासाने एक्स पोस्टमध्ये म्हटलंय की, युक्रेनमधील भारतीय औषध कंपनी कुसूमच्या गोदामावर रशियाने आज क्षेपणास्त्र हल्ला केला. भारताबरोबर खास मैत्री असल्याचं सांगत मॉस्कोकडून सातत्याने भारतीय व्यवसायांना लक्ष्य केलंय जातंय. वृद्ध आणि लहान मुलांसाठी बनवण्यात येणाऱ्या औषधांना नष्ट करण्यात आलंय.”

कुसुम हेल्थकेअरच्या या गोदामात मानवी गरजांसाठी आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य ठेवण्यात आले होते. कीवने अद्याप जीवितहानी किंवा नुकसानीची माहिती जाहीर केलेली नाही, परंतु आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन म्हणून या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान, या हल्ल्याबाबत रशियाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

कीवच्या पोस्टपूर्वी, युक्रेनमधील ब्रिटनचे राजदूत मार्टिन हॅरिस यांनी हल्ल्याची माहिती दिली आणि हा हल्ला क्षेपणास्त्राने नव्हे तर रशियन ड्रोनने केला असल्याचे सांगितले.”आज सकाळी रशियन ड्रोनने कीवमधील एका मोठ्या औषधांच्या गोदामाला पूर्णपणे उद्ध्वस्त केले, वृद्ध आणि मुलांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा साठा जाळून टाकला. युक्रेनियन नागरिकांविरुद्ध रशियाची दहशतवादाची मोहीम सुरूच आहे,” मार्टिन यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

कुसुम कंपनी काय आहे?

कंपनीच्या वेबसाइटनुसार, कुसुम हा एक औषध कंपन्यांचा एक बहुराष्ट्रीय गट आहे ज्यामध्ये युक्रेन, भारत, मोल्दोव्हा, कझाकस्तान, उझबेकिस्तान, फिलीपिन्स, म्यानमार, मेक्सिको आणि केनियामध्ये २००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कुसुमद्वारे चार आधुनिक उत्पादन सुविधा दिल्या जातात. त्यापैकी तीन सुविधा भारतात असून एक युक्रेनमध्ये आहे.