युक्रेनमधून स्वतंत्र होऊन रशियात विलीन होण्याच्या निर्णयावर क्रायमियाच्या जनतेने सोमवारी शिक्कामोर्तब केले. क्रायमियाच्या या निर्णयावर अमेरिका व मित्र राष्ट्रांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून रशियावर आर्थिक र्निबध लादण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. मात्र, आर्थिक र्निबधांचा हा निर्णय अमेरिका व युरोपीय महासंघाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. क्रायमियाच्या निर्णयाचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारात उमटले असून आशियातील क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे रशिया व अमेरिका यांच्यात शीतयुद्ध पेटण्याच्या शक्यतेबरोबरच आशियावरही तेलसंकटाचे ढग जमण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

युक्रेनमध्येच राहायचे की रशियात विलीन व्हायचे या निर्णयावर क्रायमियामध्ये रविवारी सार्वमत घेण्यात आले होते. त्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला. सार्वमतात क्रायमियाच्या जनतेने रशियाच्या बाजूने कौल दिल्याने यातील गुंतागुंत वाढण्याची शक्यता आहे. क्रायमियाच्या निर्णयानंतर लगेचच अमेरिकेने रशियावर आर्थिक र्निबध लादण्याची घोषणा केली. मात्र, त्यामुळे अमेरिका व युरोपीय संघातील देशांनाच त्याची झळ पोहोचण्याची शक्यता आहे. कारण युरोपीय संघातील बहुतांश देशांना रशियाकडूनच तेल व नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो व त्यातील ७० टक्के पुरवठा युक्रेनच्या माध्यमातूनच होतो. त्यामुळे तेलाच्या किंमती भडकण्याची शक्यता असून शीतयुद्धाचाही भडका उडण्याची चिन्हे आहेत. आशियातील क्रूड तेलाच्या पुरवठय़ावरही त्याचा परिणाम होणार असून आंतरराष्ट्रीय समुदायात त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

२१ अधिकाऱ्यांना चाप
क्रायमियाला आपल्या बाजूने वळवण्यात महत्त्वाची भूमिका घेणाऱ्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे १३ सहकारी व त्यांच्या प्रयत्नांना पूरक भूमिका घेणारे युक्रेनमधील आठ अधिकारी अशा एकूण २१ अधिकाऱ्यांना अमेरिकेने लक्ष्य केले आहे. या सगळ्यांची विदेशातील बँक खाती गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्यावर प्रवासनिर्बंधही लादण्यात आले आहेत.

 अखेर क्रायमिया युक्रेनमधून बाहेर!

९७ टक्के जनतेचा रशियाच्या बाजूने कौल
क्रायमिया : आता पुढे काय?
क्रायमियाच्या लोकप्रतिनिधींनी प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्रातील मुख्य मुद्दे
युक्रेनमधून बाहेर पडून स्वतंत्र राज्य म्हणून जाहीर आणि रशियात सामील होण्यासाठी प्रयत्नशील
येत्या महिनाभरात रशियाचे रुबल हे चलन क्रायमियाचे अधिकृत चलन म्हणून जाहीर
येत्या ३० मार्चपासून स्थानिक प्रमाण वेळ मॉस्कोप्रमाणे, म्हणजेच ग्रीनविच प्रमाण वेळेपेक्षा ४ तास पुढे
क्रायमियाच्या सरकारी सैनिकांना रशियाच्या सैन्यात रुजू होण्याच्या संधी
युक्रेनचे कायदे क्रायमियात लागू होणार नाहीत.

क्रायमियात रविवारी घेण्यात आलेल्या सार्वमतात ९७ टक्के लोकांनी रशियात विलीन होण्याच्या बाजूने कौल दिला असून रशियाचे सैन्य तेथे तळ ठोकून आहे. युक्रेनमधून बाहेर पडून रशियात विलीन होण्याच्या क्रायमियाच्या या सार्वमताबाबत पाश्चिमात्य देशांनी विरोधी प्रतिक्रिया देताना हे सार्वमत फेटाळले असून, ते बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. या सार्वमतदानोत्तर चाचण्यातच क्रायमिया युक्रेनमधून फुटून बाहेर पडणार असल्याचे दिसून आले होते. कारण त्यातही ९३ टक्के लोकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिला होता. मात्र यानंतर, रशियावर आणखी र्निबध लादण्यासाठी अमेरिका व पाश्चिमात्य देश सरसावले आहेत.
क्रिमियन जनतेचा कौल काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करणारे व्लादिमीर पुतिन यांच्यावर आता प्रत्यक्षात निर्णय घेण्याची जबाबदारी आली आहे. एकतर त्यांना आता या वीस लाख क्रिमियन लोकांची जबाबदारी घ्यावी लागणार आहे किंवा त्यांना जॉर्जियातून फुटून बाहेर पडलेल्या अबकाझिया व दक्षिण ओसेशियाशी जोडावे लागणार आहे.
इतके दिवस युक्रेन सरकारशी वाटाघाटी करण्यास तयार नसलेल्या पुतिन यांनी तेथील सरकारशी वाटाघाटी करण्याची तयारी दर्शवली आहे. क्रायमियातील तळांवर पकडून ठेवलेल्या युक्रेनी सैनिकांचे काय करायचे याचा निर्णयही पुतिन यांना घ्यावा लागणार आहे.
दरम्यान, अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना दूरध्वनी करून क्रायमियातील सार्वमतास मान्यता दिली जाणार नाही असे सांगितले.
ज्यांचा या सार्वमतास विरोध होता ते लोक सार्वमतापासून दूर राहिले. हा केवळ शक्ती दाखवण्याचा व रशियाने जमीन बळकावण्याचा प्रकार आहे असे विरोधकांनी सांगितले. हे सार्वमत संयुक्त राष्ट्रांच्या नियमान्वये व आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार झाले आहे असा दावा पुतिन यांनी केला आहे. या सार्वमताचा अंतिम निकाल सोमवारी उशिरापर्यंत जाहीर होईल असे सांगण्यात आले.
रशियावर आता अमेरिका व युरोपीय समुदाय र्निबध आणखी कडक पद्धतीने लागू करणार आहेत. त्यामुळे युक्रेनच्या पूर्व भागात रशियाच्या समर्थनार्थ भावना भडकण्याची शक्यता आहे. पश्चिम युक्रेनमध्ये पाश्चिमात्य देश व युरोपीय समुदायाच्या बाजूने भावना आहेत. युक्रेनची लोकसंख्या ४.६ कोटी आहे.

Story img Loader