तीन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धसमाप्तीसाठी उभय देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. रशियाने पुकारलेल्या युद्धाचे परिणाम जगभरात दिसत असून अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध लावत आपली भूमिका मांडली आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचा उल्लेख ‘वॉर क्रिमिनल’ असा केला आहे. यामुळे रशियाचा संताप झाला असून त्यांनी हे अस्वीकार्य आणि अक्षम्य असल्याचं म्हटलं आहे.
“एका देशाच्या प्रमुखांकडून असं वक्तव्य होणं अस्वीकार्य आणि अक्षम्य आहे, ज्यांच्या बॉम्बने जगभरातील हजारो लोकांची हत्या केली आहे,” असं पुतीन यांचे प्रवक्ते म्हणाले असल्याचं वृत्त TASS आणि Ria Novosti या वृत्तसंस्थांनी दिलं आहे. बायडन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मला वाटतं पुतीन हे वॉर क्रिमिनल आहेत असं म्हटलं होतं. यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते.
रशियाचा तटस्थतेचा प्रस्ताव युक्रेनला अमान्य
ऑस्ट्रीया, स्वीडनप्रमाणे तटस्थतेचे धोरण अंगिकारण्याचा रशियाचा प्रस्ताव युक्रेनने बुधवारी फेटाळला. मात्र, शांतता चर्चेतून तोडगा काढण्याचा रशिया-युक्रेन यांचा आशावाद कायम आह़े.
तीन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धसमाप्तीसाठी उभय देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव्ह यांनी युक्रेनने तटस्थतेचे धोरण स्वीकारावे, ही आग्रही मागणी केली़ हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याने उभय देशांदरम्यान तोडगा निघण्याची आशा असल्याचे लावरोव्ह यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, ऑस्ट्रीया, स्वीडनप्रमाणे तटस्थतेचा प्रस्ताव अमान्य असल्याचे युक्रेनने स्पष्ट केले. ‘‘सध्या रशिया-युक्रेन यांच्यात थेट युद्ध सुरू आहे त्यामुळे कायदेशीर सुरक्षेची हमी असलेले युक्रेनियन प्रारुपच हव़े अन्य कोणत्याही देशाचे प्रारूप नको’’, अशी भूमिका युक्रेनचे संवादक मिखाईलो पोडोयाक यांनी मांडली़ आंतरराष्ट्रीय सुरक्षा हमी कराराचा आग्रह त्यांनी कायम ठेवला.
युक्रेनला ‘नाटो’मध्ये सहभागी करून घेण्याचे आश्वासन या संघटनेने २००८ मध्ये दिले होत़े रशियाने त्यास सुरूवातीपासूनच विरोध केला़ आता ‘नाटो’मध्ये सहभागी न होण्यासह युक्रेनच्या निर्लष्करीकणाचा रशियाचा आग्रह आह़े त्यामुळेच शांतता चर्चा निर्णयक टप्प्यावर असल्याचे रशियाचे म्हणणे आह़े
युक्रेनचा ताबा घेण्याचा विचार नाही : पुतिन
स्वसंरक्षणासाठी युक्रेनमध्ये ‘लष्करी मोहीम’ राबविण्याशिवाय पर्याय नव्हता, असा दावा करत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनचा ताबा घेण्याचा विचार नाही, असे बुधवारी स्पष्ट केल़े क्रिमियासह अन्य भागांत हल्ल्याचा युक्रेनचा प्रयत्न हाणून पाडल्याचा दावाही पुतिन यांनी केला़
रशियाकडून हल्ले तीव्र
रशिया-युक्रेन यांच्यात शांतता चर्चा सुरू असताना हल्ले मात्र सुरूच आहेत़ युक्रेनच्या चेर्नीहीव्ह शहरात बुधवारी रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात दहा नागरिक ठार झाल़े हे सर्वजण खाद्यपदार्थासाठी रांगेत उभे होत़े रशियाच्या सैन्याने कीव्ह शहरातील नागरी वस्तीतही हल्ले सुरूच ठेवल़े आतापर्यंत रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील ६९१ नागरिकांचा मृत्यू झाला असून, १,१४३ जण जखमी झाले, असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेने म्हटले आह़े मात्र, मृतांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े तसेच युक्रेनमधून सुमारे ३० लाख नागरिकांनी स्थलांतर केले आह़े.