युक्रेनचा पेचप्रसंग चिघळत असतानाच युक्रेनच्या सरकारने युरोपीय समुदायाच्या करारावर स्वाक्षरी करण्याचे ठरवले असून क्रिमियात आक्रमण करून आम्ही बेकायदेशीर असे काही केलेले नाही, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे. दरम्यानच्या काळात रशियाने युक्रेनमध्ये काही सायबर हल्ले केल्याचेही समजते.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिदेन यांनी लॅटिन अमेरिकेचा दौरा अर्धवट सोडून बुधवारी युक्रेनच्या नवीन पंतप्रधानांसमवेत अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या होत असलेल्या बैठकीसाठी हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारीच ते चिलीच्या अध्यक्षा मिशेल बॅॅशलेट यांच्या शपधविधीसाठी चिलीमध्ये आली होते.
नंतर डॅनिलो, मेडिना व डॉमनिक प्रजासत्ताकाला जाणार होते. व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपला पुढचा दौरा रद्द केला आहे. दरम्यान, उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टोनी ब्लिनकेन यांनी सांगितले की, ओबामा हे युक्रेनला अमेरिकेचा पाठिंबा दर्शवण्यासाठी यातसेनयुक यांना भेटणार आहेत.
१६ मार्चला सार्वमत
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी सांगितले की, क्रिमियन द्वीपकल्पामधील विभाजनवादी चळवळीत आम्ही केलेला हस्तक्षेप आंतरराष्ट्रीय कायद्याला धरून आहे, पण युक्रेनच्या मंत्र्यांनी मात्र एक सेंटिमीटरही जमीन देणार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान रशियाने क्रिमियात सैन्य वाढवले असून रशियाची सैन्य दले क्रिमियाला रशियाबरोबर येण्यासाठी पटवित आहेत. पुढील रविवारी तेथे या प्रश्नावर सार्वमत घेणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले की, अशा प्रकारे सार्वमत घेणे हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग असून पुतिन यांनी मात्र ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून व जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांना दूरध्वनी करून रशियाच्या या सार्वमताला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
युरोपीय समुदायाशी करार
युक्रेनने असे म्हटले आहे की, या महिन्यातच आम्ही युरोपशी एकात्म होण्यासाठी युरोपीय समुदाय करारावर स्वाक्षऱ्या करणार आहोत. यात युरोपीय समुदायाशी राजकीय संबंध प्रस्थापित केले जातील व बहुदा १७ ते २१ मार्च दरम्यान हा करार होईल, असे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्रि देशत्स्या यांनी युक्रेनियन दूरचित्रवाणीला सांगितले आहे.
युरोपीय समुदायाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक १७ मार्चला होत आहे व युरोपीय समुदायाच्या नेत्यांची शिखर बैठक २०-२१ मार्चला होत आहे. गेल्या नोव्हेंबरमध्येच या करारावर ब्रुसेल्स येथे स्वाक्षरी केली जाणार होती, पण माजी अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांनी तो करार रद्द करून रशियाबरोबर जाण्याचे ठरवले व त्यानंतर सामूहिक निदर्शनात देशभरात १०० जण ठार झाले, तर गेल्या महिन्यात यानुकोविच यांची पदावरून हकालपट्टी झाली.
रशियाचे सायबर हल्ले
युक्रेनमध्ये सायबर हल्लेखोरांनी हल्ले केले असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण कंत्राटदार कंपनी असलेल्या बीएइ सिस्टीम्सने म्हटले आहे. युक्रेनच्या संगणकांवर २२ हल्ले झाले असून ते जानेवारी २०१३ मध्ये व्यावसायिक पद्धतीने करण्यात आले आहेत. या हल्ल्यांचा स्रोत समजला नसला तरी जर्मनीच्या एका कंपनीच्या मते या हल्ल्यांचे मूळ रशियात आहे. हल्लेखोरांनी स्नेक मालवेअर वापरून युक्रेनच्या संगणकांचा ताबा मिळवून माहिती चोरली. याचा अर्थ हल्लेखोरांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे असे बीएइ या कंपनीने म्हटले आहे. ‘जी डाटा सॉफ्टवेअर’ या जर्मनीच्या कंपनीच्या मते स्नेक सॉफ्टवेअरचे ‘उरोबुरोस’ हे रशियन सॉफ्टवेअर यात वापरले आहे. त्याचा अर्थ, स्वत:चीच शेपटी खाणारा साप, असा आहे व हेच सॉफ्टवेअर २००८ मध्ये अमेरिकी लष्करी तळांवर मालवेअर हल्ले करण्यासाठी वापरण्यात आले होते.