भारताच्या दुसऱ्या चांद्रयान मोहिमेत युक्रेनने सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. रशियाचे मून लँडर तंत्रज्ञान मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या असताना युक्रेनचा हा देकार महत्त्वाचा ठरणार आहे.
भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेत आमच्या कंपन्या मदत करायला तयार आहेत असे युक्रेनचे अध्यक्ष व्हिक्टर यानुकोव्याच यांनी आज येथे सांगितले. अ‍ॅसोचेम, फिक्की, सीआयआय यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. चांद्रयान-२ येत्या सप्टेंबर २०१३ मध्ये सोडले जाणार असे अपेक्षित आहे.
युक्रेनचे दुसरे नेते अनातोली किनाख यांनी सांगितले की, युक्रेनकडे अत्याधुनिक असे वैश्विक केंद्र आहे जे चांद्रयान-२ मोहिमेत मदत करू शकेल. दोन्ही देशात विमान व जहाज बांधणी या दोन क्षेत्रातही सहकार्य होऊ शकते असे ते म्हणाले.