PM Denys Shmyhal: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा ठेवून अमेरिका दौऱ्यावर गेलेले युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना जाहीर दमदाटीला सामोरं जावं लागल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी चर्चा अर्धवट सोडली. तसेच अमेरिका, व्हाइट हाऊस व अमेरिकन जनतेचे जाहीर आभार मानत तेथील उर्वरित कार्यक्रम रद्द करून ते तेथून निघून गेले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प आणि वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यातील वादाचे पडसाद त्यानंतर उमटल्याचं पाहायला मिळालं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या वादानंतर मोठा निर्णय घेत अमेरिकेकडून युक्रेनला रशियाविरोधात जी लष्करी मदत दिली जात होती, ती मदत ट्रम्प यांनी रोखली. यामुळे युक्रेनला मोठा धक्का बसला. झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यातील वादाचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. यानंतर आता युक्रेनचे पंतप्रधान डेनिस श्मीगल यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. स्वसंरक्षणासाठी अमेरिकेशी खनिजांचा सौदा करण्यास आम्ही कधीही तयार असल्याचं डेनिस श्मीगल यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टु़डेनी दिलं आहे.

डेनिस श्मीगल यांनी काय म्हटलं?

अमेरिकेच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना युक्रेनचे पंतप्रधान डेनिस श्मीगल यांनी म्हटलं की, “कीव केव्हाही वॉशिंग्टनशी खनिज करार करू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची लष्करी मदत थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही युक्रेन रशियन आक्रमणाला तोंड देण्यासाठी सर्व काही करेल. अशा करारावर स्वाक्षरी करून आम्ही कधीही अमेरिकेसोबत हे सहकार्य सुरू करण्यास तयार आहोत”, असं डेनिस श्मीगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

“युक्रेन आणि युरोप या दोन्ही देशांसाठी अमेरिकेकडून सुरक्षा हमी अस्तित्वात आहेत. आम्हाला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युरोप आणि ‘जी ७’ देशांकडून ठोस सुरक्षेची हमी हवी आहे आणि आम्ही मागितली आहे. हे केवळ युक्रेनसाठीच नाही तर युरोपियन युनियनसाठी महत्वाचं आहे”, असं डेनिस श्मीगल यांनी म्हटलं. तसेच ट्रम्प यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी म्हटलं की, क्रेमलिनने शांततेसाठी सर्वोत्तम योगदान म्हटले आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी ठामपणे सांगितले की हा एक उपाय आहे जो खरोखरच कीव राजवटीला शांतता प्रक्रियेकडे ढकलू शकेल. दरम्यान, युक्रेनला लष्करी मदत थांबवण्याच्या ट्रम्प यांच्या घोषणेनंतर डेनिस श्मीगल यांचं हे विधान महत्वाचं मानल जात आहे.

Story img Loader