Volodymyr Zelenskyy On Donald Trump : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची २० डिसेंबर रोजी शपथ घेतली. चार वर्षांनंतर पुनरागमन करत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेची सूत्रे हातात घेताच अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय महत्वाचा मानला जातो. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. ‘डोनाल्ड ट्रम्प हे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्यासाठी पुढाकार घेतील’, अशी अपेक्षा झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला जवळपास एक वर्ष पूर्ण झालं आहे. रशिया आणि युक्रेन या दोन देशातील युद्धामुळे हजारो नागरिकांचे प्राण गेले. या युद्धाला युक्रेन रशियाला जबाबदार धरत आहे. दोन देशांमधील संघर्ष एका वर्षानंतरही सुरु असल्यामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत आणि हजारो नागरिकांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे हा संघर्ष कुठेतरी थांबला पाहिजे, यासाठी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. वोलोडिमिर झेलेन्स्की हे सध्या स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीसाठी सहभागी झाले असून यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे भाष्य केलं. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

झेलेन्स्की यांनी म्हटलं की, “अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर महत्वाची बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच युक्रेन आणि रशियातील संघर्षासंदर्भात आतापर्यंत अनेकदा चर्चा झाल्या. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी झेलेन्स्की यांना रशियाच्या अध्यक्षांशी संभाव्य चर्चांबाबत विचारले असता त्यांनी म्हटलं की, “मी पुतीन यांच्याशी फोनवर कोणतीही चर्चा केलेली नाही. मात्र, आम्ही चर्चा करू आणि तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मात्र, या चर्चांबाबत जर नेते बोलत नसतील आणि गुप्तचर सेवा बोलत असतील तर ते योग्य नाही. त्यामुळे पुतिन यांनी चर्चासाठी सकारात्मक भूमिका घेणं गरजेचं आहे”, असंही ते म्हणाले.

“आम्ही कोणत्याही पद्धतीचं युद्ध सुरु केलेलं नाही. पुतिन यांनी युद्ध सुरू केलं आहे. मात्र, हे युद्ध आम्हाला थांबवायचं आहे. तसेच अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील हे युद्ध थांबवण्याच्या संदर्भात सकारात्मक आहेत. मात्र, पुतिन यांना युद्ध संपवायचं आहे की नाही? हा प्रश्न आहे, तेसच पुतिन यांचा दृष्टीकोन या युद्धातून बाहेर पडण्याचा आहे असं वाटत नाही”, असंही झेलेन्स्की यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine president volodymyr zelenskyy on ukraine russia war and us president donald trump russia president vladimir putin gkt