रशिया-युक्रेन यांच्या दरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच रशियाचा दौरा करत आहेत. याआधी ते २०१९ साली रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. रशियाची राजधानी मॉस्कोमधील पुतिन यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर पुतिन यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पुतिन आणि मोदी यांची गळाभेटही झाली. मात्र त्यांच्या भेटीवर आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी आक्षेप घेतला असून “ही भेट निराशाजनक असून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लावणारी आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी रशियामध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची मॉस्कोतील प्रेसिडन्ट हाऊस येथे भेट घेतली. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी आणि पुतिन पहिल्यांदाच रशियात एकत्र भेटत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी एकटा आलेलो नाही, माझ्याबरोबर…”, पंतप्रधान मोदींचा मॉस्कोमधील भारतीयांशी संवाद; म्हणाले, “तिसऱ्या टर्ममध्ये मी…”

मागच्याच महिन्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि पंतप्रधान मोदी यांच्यात इटलीमध्ये जी७ देशांच्या शिखर परिषदेदरम्यान भेट झाली होती. झेलेन्सकी यांनी एक्सवर पोस्ट टाकून मोदी-पुतिन भेटीबद्दल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचा पंतप्रधान हा रक्तपात करणाऱ्या एका गुन्हेगाराची मॉस्कोमध्ये गळाभेट घेतो. हे चित्र प्रचंड निराशाजनक आहे. तसेच शांततेच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्यासारखे आहे.

सोमवारी मोदी आणि पुतिन यांची भेट होत असताना रशियाकडून युक्रेनच्या पाच शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. एपी वृत्तसमूहाने दिलेल्या वृत्तानुसार, एक क्षेपणास्त्र युक्रेनमधील सर्वात मोठ्या लहान मुलांच्या रुग्णालयावर कोसळले. पाचही क्षेपणास्त्र हल्ल्यात ३१ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान रशियाने झेलेन्स्की यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्हा यांनी सांगितले की, आम्ही कोणताही हल्ला केलेला नाही. आम्ही सामान्य नागरिकांना लक्ष्य करत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. तर युक्रेन सुरक्षा दलाकडून लहान मुलांच्या रुग्णालयावर कोसळलेल्या रशियन केएच-१०१ क्षेपणास्त्राचे अवशेष सादर करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine president zelensky reacts to pm narendra modi meeting with putin in russia kvg