युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी भारत, जपान, ब्राझिल आणि युक्रेन हे देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य का नाहीत? अशी विचारणा केली आहे. लवकरच यावर तोडगा काढला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ७७व्या महासभेमध्ये दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी सर्व जगाला मदतीची साद घातली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन सैन्याची राखीव कुमक युक्रेनमध्ये उतरवण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच झेलेन्स्की यांचं भाषण झालं. शिवाय रशियाच्या हल्ल्यानंतर सर्व जगाला उद्देशून त्यांचे हे पहिलेच निवेदन होतं.
“संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणांची गरज असल्याबद्दल फार काही बोललं गेलं होतं. पण काय निष्पन्न झालं? काहीच उत्तर मिळालेलं नाही,” असा संताप झेलेन्स्की यांनी व्यक्त केला. “संयुक्त राष्ट्रांमध्ये मोठय़ा सुधारणांची गरज आहे. आफ्रिका, दक्षिण अमेरिका, बहुतांश आशिया, मध्य आणि पूर्व युरोप नकाराधिकारापासून दूर आहे. रशियाला मात्र सुरक्षा परिषदेत कायमचे स्थान आहे, ते का?,” अशी विचारणाही त्यांनी केली.
इंच-इंच भूमी परत मिळवू! ; युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींचा निर्धार
‘‘आम्ही आमच्या सर्व देशावर युक्रेनचा झेंडा पुन्हा फडकवू. आम्ही शस्त्रांच्या मदतीने हे करू शकतो, पण त्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. परिणामांचा विचार न करता राष्ट्रे आपल्या महत्वाकांक्षा रेटू लागली तर या संघटनेचे (संयुक्त राष्ट्रे) अस्तित्वच धोक्यात येईल,’’ असंही झेलेन्स्की म्हणाले.
भारत गेल्या अनेक वर्षांपासून संयुक्त राष्ट्रांकडे सुधारणा करण्याची मागणी करत असून, स्थायी सदस्य होण्याचा आपल्याला हक्क असल्याचं सांगत आहे. सध्याच्या घडीला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाच स्थायी आणि १० अस्थायी सदस्य देश आहेत, जे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेतून दोन वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात.
रशिया, यूके, चीन, फ्रान्स आणि अमेरिका हे पाच देश कायमचे सदस्य आहेत. या देशांना एखाद्या ठोस ठरावाविरोधात मतदानाचा अधिकार आहे. गेल्या काही काळापासून स्थायी सदस्य देशांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.