संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने रशियन बंडखोरांना ठरावाद्वारे इशारा दिल्यानंतर त्यांनी विमानाचे ब्लॅकबॉक्स मलेशियन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहेत. दरम्यान एमएच १७ या विमानातील २८० प्रवाशांचे मृतदेह डच तज्ञांच्या हवाली करण्याची तयारी दर्शवली आहे. मृतदेहांनी भरलेली रेल्वे युक्रेनच्या खारकिव भागात पोहोचली आहे. हे विमान बंडखोरांनी गुरुवारी रशियाने पुरवलेल्या क्षेपणास्त्राच्या मदतीने पाडल्याचा संशय आहे.
बंडखोरांनी या घटनेनंतर सर्व मृतदेह शीतागाराची सोय असलेल्या रेल्वे डब्यातून त्यांच्या भागात नेले होते परंतु आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याने त्यांनी हे मृतदेह ताब्यात दिले आहेत. नेदरलँड्सचे जे प्रवासी होते त्यांचे मृतदेह नेदरलँड्सला नेले जाणार आहेत. याच देशाचे जास्त प्रवासी (१९३) विमानात होते. या देशानेच या विमान दुर्घटनेच्या चौकशीत पुढाकार घेतला असून या घटनेमुळे युक्रेनच्या पेचप्रसंगाची झळ आता आंतरराष्ट्रीय समुदायालाही बसली आहे.
ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथील परिस्थिती वाईट असल्याबाबत जागतिक नेत्यांनी निषेध व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनाही सोमवारी काही मृतदेह मिळाले. बंडखोरांनी ते शीतकरण यंत्रणा असलेल्या रेल्वेच्या डब्यात ठेवले होते. उन्हाळ्यामुळे मृतदेहांची अवस्था वाईट होत चालली होती. आता ते खारकिव येथे आणण्यात आले आहेत.
त्या भागात स्थानिक शस्त्रसंधी
दरम्यान डोनेस्कचे पंतप्रधान बोरोडाइ यांनी अपघात क्षेत्राच्या १० किलोमीटर क्षेत्रात शस्त्रसंधी जारी केली असून युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी तेथील लढाई थांबवण्याचे सूचित केले आहे. या स्थानिक शस्त्रसंधीमुळे आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना मोठय़ा भागाचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली, फोरेन्सिक तज्ञांचाही त्यात समावेश होता. युक्रेनच्या पूर्वेला सरकारी दले व बंडखोर यांच्यात संघर्ष सुरू  असून स्थानिक अधिकाऱ्यांनी डोनेस्क व ल्युगास्कला वेढा दिला आहे तेथे १० नागरिक मारले गेले आहेत.
रशियाची सैन्याची जमवाजमव
दरम्यान अजूनही तणावाची स्थिती असून कीवच्या एका अधिकाऱ्याने असा दावा केला की, रशियाने आठवडाभरात ४० हजार सैन्य सीमेवर जमवले आहे.

ब्लॅक बॉक्स व फ्लाईट डेटा रेकॉर्डर पत्रकारांसमक्ष मलेशियाच्या ताब्यात
रशियावादी बंडखोरांनी हे विमान क्षेपणास्त्राने पाडल्याचा संशय असून त्यांनी या विमानाचे ब्लॅक बॉक्सही घटनास्थळी जाऊन ताब्यात घेतले व पळवून नेले होते. आता पाच दिवसांनंतर त्यांनी ते परत दिले आहेत. युरोपच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ब्रुसेल्स येथे झाल्यानंतर रशियावर आणखी र्निबध लादण्याचा इशारा देण्यात आला, तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळानेही रशियन बंडखोरांनी तपासात व मृतदेह ताब्यात घेण्यात अडथळे आणू नयेत असा ठराव केला होता. दोन ब्लॅक बॉक्स व एक फ्लाइट डेटा रेकॉर्डर रशियन बंडखोरांनी निमूटपणे मलेशियाच्या अधिकाऱ्यांकडे दिला. स्वयंघोषित डोनेस्क लोक प्रजासत्ताकाचे पंतप्रधान अलेक्झांडर बोरोडाई यांनी पत्रकारांसमक्ष ब्लॅकबॉक्स व फ्लाइट डेटा रेकॉर्डर मलेशियाच्या हवाली केला.
आणखी २१ मृतदेह सापडले

Story img Loader