रशियाच्या लष्करी आक्रमणामुळे युक्रेनचे हवाई क्षेत्र २४ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले आहे. युक्रेनमध्ये अनेक भारतीयांसह इतर देशातील नागरिक अडकून पडले आहेत. या सर्वांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युक्रेन सोडून बाहेर पडणाऱ्या भारतीयांना रुमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया व पोलंड यांसारख्या युक्रेनच्या शेजारी देशांतून विमानाने परत आणले जात आहे. दरम्यान, दीड हजारहून अधिक भारतीयांना घेऊन आठ विमाने सोमवारी युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतात परतणार आहेत, असे असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने रविवारी सांगितले. त्याची सुरुवात झाली असून काही विमानं आज मायदेशी परतली आहे.
Russia-Ukraine War : १५०० भारतीय आज परतणार
आज सकाळी युक्रेनमधून मायदेशी परतलेल्या एका तरुणाला त्याच्यासोबत पाच श्वान आणण्याची परवानगी दिल्याने त्याने केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले आहेत. युद्धग्रस्त युक्रेनमधून आज सकाळी परत आलेल्या रणजीत रेड्डीने त्याच्यासोबत पाच श्वान आणले आहेत. तो म्हणाला, “आम्हाला भारतीय दूतावासाच्या प्रयत्नांचे कौतुक करावे लागेल. त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. मला माझे कुत्रे माझ्यासोबत आणण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची विशेष परवानगी मिळाली. मी पाच कुत्रे सोबत आणले आहेत,” असं त्याने सांगितलं.
भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत २१३५ भारतीयांना रविवारी ११ विशेष नागरी विमानांतून युक्रेनच्या शेजारी देशांमधून आणण्यात आले, असे मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले.
भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत आतापर्यंत २०५६ प्रवाशांना परत आणण्यासाठी १० विमानांच्या फेऱ्या केल्या असून, २६ टन मदतसामग्री त्या देशांमध्ये नेली आहे. हवाई दल सी-१७ लष्करी वाहतूक विमानांच्या साहाय्याने ही उड्डाणे करत आहे. नागरी विमाने इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा व स्पाइसजेट यांसारख्या भारतीय विमान कंपन्यांमार्फत संचालित केली जात आहेत.