युक्रेनमधील संघर्षांला कारण ठरलेल्या रशियाविरुद्ध आर्थिक र्निबध अधिक कडक करण्याच्या निर्णयावर गांभीर्याने विचार केला जाईल, असा इशारा युरोपीय महासंघाने पुतीन सरकारला गुरुवारी दिला.
अमेरिकेने काही दिवसांपूर्वी रशियाविरुद्ध कठोर पावले उचलण्याच्या सूचना केली होती. जूनमध्ये झालेल्या शिखर परिषदेत युक्रेन अध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीनंतर फार काही घडले नाही, असे जर्मनच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल म्हणाल्या. युक्रेनच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी, तसेच युरोपीय महासंघातील उच्च अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी त्या ब्रसेल्स येथे आल्या आहेत. युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठीचे प्रयत्न अत्यंत तोकडे आहेत, असे त्या म्हणाल्या.