युक्रेनच्या मुद्द्यावर सोमवारी पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये (Ukraine Russia Crisis UNSC Meeting) भारताने आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र त्याच वेळी अमेरिका आणि रशियामधील मतभेद या बैठकीमध्येही समोर आले आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा एकदा रशियाला परिणाम भोगावे लागतील असा थेट इशाराच दिलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताची भूमिका काय?
सध्या युक्रेन प्रश्नामुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी काय करता येईल याबद्दलचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असं भारताने जागतिक मंचावरुन सांगितलं आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ति यांनी ‘अंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका (युक्रेन)’ या विषयावरील चर्चेमध्ये “भारताला एक असं उत्तर शोधण्यामध्ये रस आहे ज्यामुळे हा तणाव तात्काळ संपुष्टात येण्यास मदत होईल. आम्ही सर्वच पक्षांच्या संपर्कात आहोत.”

ती अंमलबजावणी करावी…
“आम्ही या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षांना प्रत्येक प्रकारच्या राजकीय माध्यमातून जोडून ठेवण्याचा आणि मिन्स्क पॅकेजचं पूर्णपणे पालन करण्याच्या दिशेने काम करत राहण्याचा आग्रह करतो,” असंही भारताने म्हटलं. “युक्रेनसंदर्भातील तणाव कमी करण्यासाठी मिन्स्क करार आणि नॉरमॅण्डी कराराच्या आधारे सुरु असणाऱ्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. आम्ही जुलै २०२० च्या युद्धविरामाच्या निर्णयानुसार ठरलेल्या गोष्टींची सशर्त अंमलबजावणी करण्याची पाठराखण करतोय,” असंही तिरुमूर्ति म्हणाले.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी दिला इशारा…
दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा एकदा युक्रेन मुद्द्यावरुन रशियाला परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिलाय. यूएनएससीमध्ये बोलतान बायडेन यांनी, “जर रशिया चर्चेच्या माध्यमातून आमच्या सुरक्षेसंदर्भातील चिंता दूर करण्यासाठी तयार असेल तर अमेरिका आणि आमचे सहकारी देश याच चर्चेच्या दिशेने पुढे जातील. मात्र रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असं म्हटलंय.

का निर्माण झालाय संभ्रम
युक्रेनच्या सीमेवर एक लाखाहून अधिक खडे सैन्य रशियाने जमवल्यामुळे क्रिमियाप्रमाणेच युक्रेनच्या आणखी एखाद्या भूभागावर कब्जा करण्याचा रशियाचा इरादा असावा, अशी चर्चा प्रामुख्याने पाश्चिमात्य माध्यमे आणि नेत्यांमध्ये सुरू झाली आहे. रशियाकडून आक्रमणाचा आमचा कोणताही विचार नसल्याचं वारंवार सांगितलं जात आहे.

मतदानात भारताने भाग घेतला नाही.
भारताने सोमवारी युक्रेनच्या सीमेवर सुरु असणाऱ्या हलचालींसंदर्भातील चर्चेसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीआधी पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रक्रियात्मक मदतानामध्ये सहभाग नोंदवला नाही. युक्रेन मुद्द्यावर चर्चेसाठी समोवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीआधी रशिया, एक स्थायी सभासद आणि एक वीटो-धारक सदस्याने युक्रेन विषयासंदर्भातील बैठक पुढे सुरु ठेवावी की नाही याबद्दल मतदान घेतलं.

१० मतं बैठकीच्या बाजूने…
रशिया आणि चीनने या बैठकीच्या विरोधात मतदान केलं. तर भारत, गॅबॉन आणि केनियाने या मतदानामध्ये सहभाग घेतला नाही. नॉर्वे, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, आर्यलॅण्ड, ब्राझील आणि मॅक्सिकोसहीत परिषदेतील अन्य सर्व १० सदस्यांनी बैठक सुरु ठेवण्याच्या बाजूने मतदान केलं. बैठक सुरु ठेवण्यासाठी ९ मतांची गरज होती. एकूण १० मतं बैठक सुरु ठेवण्याच्या बाजूने पडल्याने पुढे बैठक सुरु ठेवण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine russia crisis us exchange harsh words at unsc meeting scsg