युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा आजचा चौथा दिवस असून, दोन्ही देशांमधील तणाव आणखीनच वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता युक्रेने एकीकडे सैन्य शक्तीद्वारे रशियाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय न्यायालयात रशियाच्या विरोधात खटला दाखल केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाला घेरण्याची युक्रेनची योजना दिसत आहे. त्यामुळेच युक्रेनने आता रशियन सरकारला आपल्या सार्वभौमत्व आणि अखंडतेवर हल्ला केल्याबद्दल हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केल्याची माहिती दिली आहे. तसेच, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील रशियाची जागा काढून घेतली पाहिजे, असंही झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
Russia-Ukraine War Live: युक्रेनने चर्चेची संधी गमावली, पुतीन यांचा आरोप
“युक्रेनने रशियाविरुद्धचा अर्ज आयसीजेकडे सादर केला आहे. आक्रमकतेने युक्रेनमध्ये नरसंहार केल्याबद्दल रशियाला जबाबदार धरले पाहिजे. तसेच आम्ही रशियाला त्वरित लष्करी कारवाई थांबवण्याचा आदेश देण्याची विनंती करतो आणि पुढील आठवड्यात याप्रकरणी सुणावणी सुरू होण्याची अपेक्षा करतो,” असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे.
त्याच वेळी अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियाची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. या देशांनी रशियाला आंतरराष्ट्रीय बँकिंग ऑपरेटिंग सिस्टम SWIFT मधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी अमेरिकेने युक्रेनला ३५ कोटी डॉलरची लष्करी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तर जर्मनीने एक हजार रणगाडाविरोधी शस्त्रे आणि ५०० स्टिंगर क्षेपणास्त्रे देण्याची घोषणा केली आहे.
दुसरीकडे रशियाने शेजारील बेलारूसमध्ये युक्रेनला चर्चेची ऑफर दिली आहे. मात्र, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ही ऑफर फेटाळून लावली आहे. ज्या ठिकाणाहून त्याच्या देशावर हल्ला झाला आहे, त्या ठिकाणाहून आपण रशियाशी बोलणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.