रशियाच्या साम्राज्यविस्ताराच्या भूमिकेप्रकरणी युक्रेनचे पंतप्रधान आर्सेनी यात्सेन्यूक यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची मदत घेण्याचे ठरविले असल्यामुळे क्रिमियाप्रकरणी रशियासमवेत लढा न देण्याचा निर्णय युक्रेनचे हंगामी अध्यक्ष ओलेसांद्र तुर्चीनोव्ह यांनी बुधवारी घोषित केला.
युक्रेनचे रशियावादी नेते व्हिक्टर यानुकोव्हीच यांना २२ फेब्रुवारी रोजी पदच्युत करण्यात आल्यानंतर रशियन फौजांनी काळ्या समुद्रानजिकची भूमी कब्जात घेतलेली असली, तरी आपले सैन्य ही भूमी परत घेण्याच्या फंदात पडणार नसल्याचे तुर्चीनोव्ह यांनी स्पष्ट केले. क्रिमियात लष्करी कारवाई करण्यात आल्यास पूर्व सीमेवर आम्ही कमी पडू आणि युक्रेनचे संरक्षण करणे आम्हाला जमणार नाही, अशी कबुली तुर्चीनोव्ह यांनी दिली.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आतापर्यंत तरी आंतरराष्ट्रीय दबावास झुगारून दिले असून, पूर्व आणि पाश्चिमात्यांच्या संबंधांमधील सर्वात वाईट ठरलेल्या तणावावर तोडगा निघण्यासंबंधी त्यांनी क्यीव्हशीही संबंध तोडून टाकले आहेत, असे ते म्हणाले. हा संघर्ष संपुष्टात यावा म्हणून सर्व परराष्ट्र मंत्रालयांशी त्यांनी संपर्क तोडला असून, राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचा प्रस्ताव रशिया फेटाळून लावत असल्याचा आरोप तुर्चीनोव्ह यांनी केला.

Story img Loader