गेल्या महिन्यात २४ फेब्रुवारी रोजी रशियानं युक्रेनमध्ये सैन्य घुसवलं आणि पहिला हल्ला झाला. तेव्हापासून गेल्या जवळपास तीन आठवड्यांपासून रशियानं युक्रेनच्या वेगवेगळ्या भागात हल्ले करून युक्रेनच्या सैन्याला जेरीला आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अजूनही युक्रेनची राजधानी किव्ह सर करणं रशियन फौजांना शक्य झालेलं नाही. एकीकडे रशियाचा दारुगोळा आता संपत आल्याचं सांगितलं जात असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियावर कठोर निर्बंध लादले जात आहेत. या पार्श्वभूमीवर युद्ध लवकरच संपण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. युद्धात आत्तापर्यंत दोन्ही बाजूचे सामान्य नागरिक आणि सैनिक अशी एकूण किती माणसं मारली गेली, याविषयी वेगवेगळे दावे दोन्ही बाजूंनी केले जात आहेत. मात्र, हा आकडा हजारोंच्या घरात असल्याचं ठामपणे सांगितलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आत्तापर्यंत युक्रेनमधून जवळपास ३ लाख नागिकांनी स्थलांतर केल्याची आकडेवारी संयुक्त राष्ट्रांकडून देण्यात आली आहे. या आकडेवारीवर अद्यापपर्यंत कुणीही आक्षेप घेतलेला नाही. मात्र, युद्धात बळी पडलेल्या नागरीक आणि सैनिकांच्या आकडेवारीवर मात्र दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

७ हजार रशियन सैनिक मारले गेले?

द न्यूयॉर्क टाईम्सनं अमेरिकी प्रशासनाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार आत्तापर्यंत युक्रेनमध्ये ७ हजार रशियन सैनिक ठार झाले असून १४ हजार जखमी झाले आहेत. हा आकडा अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तानमध्ये २० वर्ष लढलेल्या युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांपेक्षाही जास्त आहे. पण दुसरीकडे रशियानं मात्र हा दावा खोडून काढत २ मार्चपर्यंत फक्त ४९८ रशियन सैनिक मृत्यूमुखी पडले असून १५९७ जखमी झाल्याची आकडेवारी दिली आहे. त्यानंतर रशियाकडून कोणतीही आकडेवारी अद्याप देण्यात आलेली नाही.

युक्रेनमध्ये थिएटरवर शक्तिशाली बॉम्बहल्ला, तब्बल १२०० नागरिक ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता

युक्रेनची नेमकी किती हानी?

रशियानं युक्रेनच्या नुकसानाबद्दल दिलेल्या आकडेवारीनुसार २ मार्चपर्यंत म्हणजे युद्ध सुरू होऊन अवघ्या ६ दिवसांत २ हजार ८७० युक्रेन सैनिक मारले गेले असून ३ हजार ७०० सैनिक जखमी झाले आहेत. तसेच, ५७२ सैनिकांना युद्धबंदी करण्यात आलं आहे. पण युक्रेननं हा दावा खोडून काढत १२ मार्चपर्यंत १३०० सैनिक मारले गेल्याची माहिती दिली आहे. दुसरीकडे, रशियाचे १३ हजार ८०० सैनिक युद्धात मारले गेले असून ६०० युद्धबंदी करण्यात आल्याची माहिती युक्रेननं १६ मार्चला दिली आहे.

अमेरिकी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार २ हजार ते ४ हजार युक्रेन सैनिक आत्तापर्यंत मरण पावले आहेत.

किती सामान्य नागरिकांचा मृत्यू?

संयुक्र राष्ट्रांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत युक्रेन युद्धात ७०० सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रत्यक्षात हा आकडा अजून जास्त असण्याची शक्यता देखील संयुक्त राष्ट्रांकडून वर्तवण्यात आली आहे. युक्रेननं मात्र फक्त मारियुपोल आणि खारकिव्हमध्येच ३००० सामान्य नागरीक मारले गेल्याचं म्हटलं आहे.