रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्यावरून जागतिक स्तरावर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दर्शवला असून अमेरिकेनं देखील आता रशियावर कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाचं सैन्य युक्रेनची राजधानी किव्हपर्यंत पोहोचलं असताना जागतिक पातळीवरून रशियाच्या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेतील स्टेट ऑफ युनिटीच्या बैठकीसमोर केलेल्या भाषणात अमेरिकेची भूमिका स्पष्टपणे मांडली. मात्र, यावेळी बायडेन यांनी केलेल्या एका चुकीची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू झाली आहे.
रशियावर कठोर निर्बंधांची घोषणा
जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियावर कठोर निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. अमेरिका आणि तर मित्र राष्ट्रांनी मिळून कोणत्याही प्रकारच्या रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद करण्यात आल्याची घोषणा बायडेन यांनी केली आहे. त्यामुळे रशियासाठी हा मोठा धक्का मानला जात असतानाच रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादण्याची देखील तयारी सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा शेवट आणि परिणाम काय असेल, याची चर्चा सुरू असताना बायडेन यांनी भाषणात केलेल्या एका चुकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं झालं काय?
बायडेन यांनी युक्रेन युद्धाविषयी अमेरिकेतील स्टेट ऑफ युनिटीसमोर बुधवारी रात्री उशीरा भाषण केलं. यावेळी त्यांनी रशियावरील निर्बंधांची घोषणा करतानाच चुकून युक्रेनऐवजी इराणचा उल्लेख केला. याच चुकीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून काही व्हिडीओमध्ये बायडेन यांच्या मागेच बसलेल्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस त्यांची चूक पुटपुटतच बरोबर करत असल्याचं दिसत आहे.
काय म्हणाले बायडेन?
“व्लादिमीर पुतिन किव्हला रणगाड्यांचा वेढा घालू शकतात. युद्धात आघाडी घेऊ शकतात. पण ते कधीच इराणी लोकांचं मन आणि आत्मा जिंकू शकणार नाहीत”, असं बायडेन यावेळी म्हणाले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ‘युक्रेनियन’ असा उल्लेख करायचा होता, मात्र चुकून ‘इरानियन’ असा उल्लेख केल्यामुळे त्यावरून चर्चा होऊ लागली आहे.
दरम्यान, ट्विटरवर व्हायरल होऊ लागलेल्या व्हिडीओंमध्ये जो बायडेन यांनी ‘इरानियन’ असा उल्लेख करताच त्यांच्या मागे बसलेल्या कमला हॅरिस यांनी पुटपुटतच ‘युक्रेनियन’ असं म्हणत ती चूक झाल्यावर शिक्कामोर्तब केलं!