पूर्व युक्रेनमध्ये ज्या भागात मलेशियाचे विमान कोसळले तिथे आणखी २१ मृतदेह सापडले आहेत. गेल्या आठवडय़ात रशियन बंडखोरांनी २९८ प्रवासी असलेले हे विमान पाडले होते.  एकूण २१ मृतदेह पिशव्यांत भरून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आले होते. ते टोरेझ येथील शीतकरण व्यवस्था असलेल्या ठिकाणी किती वेळात पोहोचवता येतील हे सांगता येत नाही. आतापर्यंत २५० मृतदेह सापडले असून तेथे रशियन बंडखोरांनी घटनास्थळाचा ताबा घेतल्याचा  विविध देशांनी निषेध केला आहे. दरम्यान डच फोरेन्सिक तज्ञांचे पथक तपासणीसाठी तेथे दाखल झाले.
बंडखोरांनी किमान २०० मृतदेह पिशवीत भरून शीतकरण व्यवस्था असलेल्या बॉक्सकारमध्ये ठेवले आहेत. त्यांनी क्रे नच्या मदतीने बोईंग ७७७ विमानाचे अवशेष हलवले, त्यामुळे त्यांच्यावर पुराव्यात हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पूर्व युक्रेनमधील विमान दुर्घटनेच्या निमित्ताने काही जण विनाकारण परिस्थितीचा फायदा उठवून आमच्यावर आरोप करीत आहेत असे पुतिन यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय हवाई संघटनेच्या पथकासह सर्व संबंधितांना घटनेच्या ठिकाणी रशियाने प्रवेश दिला आहे, असे पुतिन यांनी सांगितले. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी संडे टाइम्समध्ये म्हटले आहे की, रशियन बंडखोरांनी विमान पाडल्याचे ठोस पुरावे आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट यांनी सांगितले की, आमचे २८ नागरिक या घटनेत मारले गेले आहेत. त्यावेळच्या दूरध्वनी संभाषणासह सगळ्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्यात यावी. मृतदेह मायदेशी आणण्याची व्यवस्था आम्ही करीत आहोत. अ‍ॅबॉट यांनी मलेशिया, ब्रिटन, नेदरलँड्स या देशांच्या पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतर सांगितले की, उन्हाळ्यामुळे मृतदेह  खराब होत चालले आहेत, आता तिथे फोरेन्सिक चौकशीच्या नावाखाली जे चालले आहे ते बाग स्वच्छ करण्याच्या प्रकारासारखे आहे. एमच १७ हे विमान चुकीने पाडले गेले की, मुद्दाम पाडले गेले हे अजून स्पष्ट नसले तरी अ‍ॅमस्टरडॅमहून कौलालंपूरकडे येणारे हे विमान रशियाच्या बंडखोरांनी पूर्व युरोपमध्ये गुरुवारी पाडल्याचा संशय आहे.
ऑस्ट्रेलियाच्या वाहतूक सुरक्षा विभागाचे दोन सदस्य चौकशीसाठी युरोपला जात आहेत. रशियन बंडखोरांनी विमान पाडण्यात आल्याच्या ठिकाणी मुक्त प्रवेश द्यावा, अशी मागणी करणारा ठराव ऑस्ट्रेलियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाकडे मांडला असून त्यावर उद्यापर्यंत मतदान होणे आवश्यक आहे. दुर्घटनेच्या भागातील सर्वानीच आंतरराष्ट्रीय चौकशीला सहकार्य करावे, असेही ऑस्ट्रेलियाने या ठरावात म्हटले आहे. प्रमुख युरोपीय देशांनी रशियावर आणखी र्निबध लादण्याची धमकी दिली आहे.