चार दिवसांच्या जोरदार हल्ल्यांनंतर आणि शेकडो लोकांच्या मृत्यूनंतर संपूर्ण युक्रेनमधील सामान्य नागरिक रशियन सैन्याविरुद्धच्या लढाईत शस्त्रे हाती घेत आहेत. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत फारसे सक्षम नसतानाही – आतापर्यंत रशियन आक्रमणाचा जिद्दीने प्रतिकार करून नागरिक दररोज हिरो ठरत आहेत.
ही लढाई उल्लेखनीय आहे कारण युक्रेनमध्ये १,९६,००० सक्रिय लष्करी कर्मचारी आहेत, तर व्लादिमीर पुतिन यांच्या रशियात सुमारे ९,००,००० सक्रिय लष्करी कर्मचारी आणि दोन दशलक्ष राखीव कर्मचारी आहेत. तरीसुद्धा, युक्रेनियन लोक हार मानण्यास नकार देत आहेत शस्त्रे उचलत आहेत, त्यांच्या बागांमध्ये मोलोटोव्ह कॉकटेल बनवत आहेत. रशियाच्या अवाढव्य रणगाड्यांचा सामना करत आहेत.
युद्धविषयक ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नागरिकांना देशाचे रक्षण करण्याचे आवाहन केल्यानंतर, संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर नागरिकांना मोलोटोव्ह कॉकटेल बनविण्यास प्रोत्साहित केलं आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या आपल्या ट्विटरवरील एका पोस्टमध्ये, असे म्हटले आहे: ‘ओबोलोनमध्ये आम्ही नागरिकांना सैन्याच्या हालचालीबद्दल माहिती देण्यास सांगतो! ‘मोलोटोव्ह कॉकटेल बनवा, कब्जा करणाऱ्याची दिशाभूल करा! शांत – सावध रहा! घर सोडू नका!’
आता हे मोलोटोव्ह कॉकटेल म्हणजे कोणता खाण्यापिण्याचा पदार्थ नसून हे पेट्रोल बॉम्ब आहेत जे तुलनेने सहज बनवता येतात. काचेची बाटली ज्यामध्ये पेट्रोल किंवा अल्कोहोलसारखे कोणतेही ज्वलनशील पदार्थ लक्ष्यावर आग लावण्यासाठी वापरले जाते ते म्हणजे मोलोटोव्ह कॉकटेल. सोशल मीडियावर व्हिडीओ फिरू लागले आहेत ज्यामध्ये रहिवासी त्यांच्या नव्याने तयार केलेल्या शस्त्रांसह रशियन सैन्याविरुद्ध त्यांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करत आहेत.