युक्रेनमधील मारियोपोल या बंदराच्या शहरावर शनिवारी रशियन सैन्याने जोरदार मारा केला. मुलांसह ८० जणांनी आश्रय घेतलेल्या मशिदीवर तोफगोळय़ांचा मारा केल्याचे युक्रेन सरकारने शनिवारी सांगितले. दरम्यान, राजधानी किव्हच्या सीमेवरही युद्ध भडकले आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या दिशेनं आगेकूच करत आहे. रशियन सैन्याने उत्तर, पश्चिम आणि ईशान्येकडून युक्रेनची राजधानी किव्हला वेढा घातला आहे.
मारियोपोलवर तोफांचा भडिमार; नागरिकांनी आश्रय घेतलेली मशीद रशियाकडून लक्ष्य
युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की म्हणले, की रशियाने जर युद्धविराम घोषित केला तरच ते इस्रायलमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चेसाठी तयार आहेत. इस्रायली पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना झेलेन्स्की यांनी सांगितले की ते जेरुसलेममध्ये पुतिन यांना भेटण्यास तयार आहेत. पुतिन यांच्या भेटीसाठी बेनेट यांनी मॉस्कोला भेट दिली. तसेच ते युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की, फ्रान्स आणि जर्मनीच्या नेत्यांशी देखील बोलले. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी मध्यस्थी करण्यास मदत करण्याचा प्रयत्न म्हणून बेनेट यांनी हा पुढाकार घेतला.
झेलेन्स्की म्हणाले की, बेनेट यांनी पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. पण आपण जास्त माहिती शेअर करू शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, एका पत्रकार परिषदेत बोलताना, झेलेन्स्की म्हणाले की “रशियन युक्रेनची राजधानी तेव्हाच ताब्यात घेऊ शकतात जेव्हा ते आम्हा सर्वांना मारतील. आणि त्यांचं ध्येय आम्हाला मारण्याचं असेल तर त्यांना येऊ द्या. जर त्यांनी असंख्य बॉम्बस्फोट घडवून आणले आणि संपूर्ण प्रदेशाचा इतिहास, किव्हचा, युरोपचा इतिहास पुसून टाकला तर ते किव्हमध्ये प्रवेश करू शकतील.”