गेल्या महिन्यात २४ फेब्रुवारी रोजी रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं आणि युद्ध पुकारलं. तेव्हापासून गेल्या जवळपास तीन आठवड्यांपासून रशियानं युक्रेनच्या वेगवेगळ्या भागात हल्ले करून युक्रेनच्या सैन्याला जेरीला आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अजूनही युक्रेनची राजधानी किव्ह सर करणं रशियन फौजांना शक्य झालेलं नाही. राजधानी किव्हवर रशियन सैन्याकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत. याच हल्ल्यात प्रसिद्ध आणि ज्येष्ठ युक्रेनियन अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे.

Ukraine War : युक्रेन युद्धात आत्तापर्यंत नेमके किती मृत्यू झाले? दोन्ही देशांकडून वेगवेगळे दावे; हजारोंची आकडेवारी सादर!

यंग थिएटरच्या लोकप्रिय अभिनेत्री ओक्साना श्वेट्स यांचा किव्हमध्ये रशियन गोळीबारात मृत्यू झाला आहे. मृत्यूसमयी या अभिनेत्रीचे वय ६७ वर्ष होते. ओक्साना यांचा युक्रेनच्या सन्मानित कलाकार या देशाच्या सर्वोच्च कलात्मक पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. ओक्साना यांच्या निधनाची पुष्टी करत यंग थिएटरने एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये असं लिहिलंय की, “किव्हमधील निवासी इमारतीवर झालेल्या गोळीबारात, युक्रेनच्या प्रसिद्ध आणि आणि लोकप्रिय अभिनेत्री ओक्साना श्वेट्स यांचा मृत्यू झाला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, द न्यूयॉर्क टाईम्सनं अमेरिकी प्रशासनाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार आत्तापर्यंत युक्रेनमध्ये ७ हजार रशियन सैनिक ठार झाले असून १४ हजार जखमी झाले आहेत. हा आकडा अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तानमध्ये २० वर्ष लढलेल्या युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांपेक्षाही जास्त आहे. पण दुसरीकडे रशियानं मात्र हा दावा खोडून काढत २ मार्चपर्यंत फक्त ४९८ रशियन सैनिक मृत्यूमुखी पडले असून १५९७ जखमी झाल्याची आकडेवारी दिली आहे. त्यानंतर रशियाकडून कोणतीही आकडेवारी अद्याप देण्यात आलेली नाही.