इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. तेहरान येथे युक्रेनचं विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने १८० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बोईंग ७३७ या विमानाने उड्डाण घेताच दुर्घटनाग्रस्त झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या बोईंग ७३७ विमानाने इमाम खोमेईनी विमातनळावरुन उड्डाण केलं होतं. पण उड्डाण करताच काही तांत्रिक अडचण आल्याने विमान दुर्घटनाग्रस्त झालं.

विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळताच तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. विमानाला आग लागली असून आम्ही काही प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत अशी माहिती इराणच्या नागरी विमान वाहतूक विभागाकडून देण्यात आली होती. उपलब्ध माहितीनुसार, विमानाने बुधवारी सकाळी उड्डाण केलं होतं. मात्र त्यानंतर काही वेळातच विमानाकडून डेटा मिळणं बंद झालं. अद्याप युक्रेन एअरलाइन्सकडून यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

इराणकडून इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आल्याच्या काही तासानंतर ही दुर्घटना झाली आहे. इराणने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून अमेरिकेकडूनही वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. या हल्ल्यात अमेरिकेचे ३० सैनिक मारले गेल्याचा दावा इराणकडून करण्याता आला आहे. लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला इराणकडून करण्यात आला.

Story img Loader