युक्रेनमध्ये बॉम्बफेक आणि गोळीबार थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या विरोधात प्रत्येक संसाधनाचा वापर करा” असे आवाहन युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ इगोर पोलिखा यांनी केलं आहे.त्याचबरोबर त्यांनी रशियन आक्रमणाची तुलना मुघलांनी राजपूतांच्या विरोधात आयोजित केलेल्या नरसंहाराशी केली.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ते मंगळवारी म्हणाले, “हे राजपूतांच्या विरोधात मुघलांनी घडवलेल्या नरसंहारासारखे आहे. आम्ही मोदींसह सर्व प्रभावशाली जागतिक नेत्यांना पुतिन यांच्या विरोधात बॉम्बफेक आणि गोळीबार थांबवण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर करण्यास सांगत आहोत.”
लाईव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.
युक्रेनमधील खार्किव येथे रशियाने केलेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर डॉ इगोर पोलिखा यांनी मंगळवारी नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितलं की रशियन गोळीबार आता नागरी भागातही सुरू झाला आहे.
मंत्रालयात झालेल्या त्यांच्या बैठकीमध्ये डॉ इगोर पोलिखा म्हणाले की, भारताकडून युक्रेनला मानवतावादी मदत देण्याबाबत चर्चा झाली. “ही मदत सुरू केल्याबद्दल आम्ही भारताचे आभारी आहोत. पहिले विमान आज पोलंडमध्ये उतरण्याची शक्यता आहे. मला परराष्ट्र सचिवांनी आश्वासन दिले की युक्रेनला जास्तीत जास्त मानवतावादी मदत मिळेल,” असंही डॉ.पोलिखा म्हणाले.