रशियाच्या फौजा आणि क्रेमलिनवादी समर्थकांनी काळ्या समुद्राच्या दिशेने कब्जा घेण्याच्या दिशेने पावले टाकलेली असतानाच आपल्या भूमीचा इंचभर भागही रशियाच्या हाती लागू देणार नाही, असा इशारा युक्रेनचे हंगामी पंतप्रधान आर्सेनी यात्सेन्यूक यांनी दिला आहे. दरम्यान, रशियावादी आणि युक्रेनवादी समर्थकांमध्ये रविवारी ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणावर चकमक उडाल्याचे वृत्त असून त्यामुळे युक्रेनमध्ये तणाव वाढल्याचे सांगण्यात आले.
युक्रेनची राजधानी क्यीव्ह येथे हजारो समर्थकांच्या मेळाव्यासमोर भाषण करताना ‘ही भूमी आमचीच आहे’ या शब्दांत यात्सेन्यूक यांनी आपला ठाम निर्धार व्यक्त केला. रशियावर एके काळी राज्य केलेले व पुतिन यांचे कडवे टीकाकार मिखाईल खोदोरोस्की हेही या वेळी उपस्थित होते. खोदोरोस्की यांनी रशियात सुमारे दशकभराचा काळ तुरुंगात घालविला आहे.
युक्रेनचे रशियासमर्थक अध्यक्ष व्हिक्टर यान्यूकोव्हिच यांना त्यांच्या पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांत युक्रेनमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये जे निदर्शक ठार झाले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हंगामी अध्यक्ष ओलेक्सॅन्द्र यांनी मिनिटभर स्तब्धता पाळली. तर डोनेत्स्क या शहरातील रशियाच्या शेकडो समर्थकांनी गेल्या महिन्यात पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या निदर्शकांना श्रद्धांजली अर्पण केली. हे निदर्शक रशियावादी होते, असे सांगण्यात आले.