रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध आता गंभीर वळणावर येऊन ठेपलं आहे. रशियन फौजा थेट युक्रेनची राजधानी कीवमध्ये धडकल्या आहेत. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी रशियन फौजांनी कीवमध्ये मार्च केलं असून महत्त्वाच्या इमारतींना लक्ष्य केलं जात आहे. दुसरीकडे युक्रेनच्या फौजा देखील रशियन फौजांचा प्रतिकार करत आहेत. रशियन फौजांनी याआधीच चेर्नोबिल प्लांट ताब्यात घेतला आहे. आता कीवमध्ये हल्ला करून युक्रेनमधलं सरकारच खाली पाडण्याच्या इराद्याने रशियन फौजा मार्च करत असून युक्रेननं देखील मागे न हटण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
राष्ट्राध्यक्षांचे कुटुंबीयही युक्रेनमध्येच!
गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या राजधानीत घुसून तिथल्या सरकारला खाली खेचलं होतं. या आक्रमणावेळी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी पळ काढल्यामुळे त्याची मोठी चर्चा झाली होती. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती सध्या युक्रेनमध्ये दिसत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आपण कीवमध्येच थांबणार असून कुटुंबीय देखील कीवमध्येच आहेत, असं ठामपणे सांगितलं आहे.
“मला माहिती आहे ते माझ्यासाठीच येतायत”
वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जारी केलेल्या निवेदनामध्ये रशियाच्या हल्ल्यापुढे नमणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. “शत्रूनं (रशिया) मला त्यांचा नंबर वन टार्गेट केलं आहे. माझं कुटुंब हे त्यांचं नंबर दोनचं टार्गेट आहे हेही मला माहिती आहे. त्यांना युक्रेनच्या राष्ट्रप्रमुखालाच लक्ष्य करून युक्रेनला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करायचं आहे. पण मी कुठेही पळून जाणार नाही. मी राजधानीतच राहणार आहे. माझं कुटुंब देखील युक्रेनमध्येच आहे”, असं वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हटलं आहे.
१ लाख रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसलं
गुरुवारी रशियाने जमिनीवरून, सागरी मार्गाने आणि हवाई मार्गाने युक्रेनवर हल्ला चढवला. तब्बल १ लाख सैन्याने युक्रेनमध्ये शिरून तिथल्या फौजांचा प्रतिकार मोडून काढालया सुरुवात केली. गेल्या दोन महिन्यांच्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर अखेर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले. आज युद्धाचा दुसरा दिवस असून रशियन फौजा थेट युक्रेनची राजधानी कीवमध्ये शिरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनकडून इतर देशांना मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे.
Video: युक्रेनमध्ये अडकलेल्या मुंबईकर विद्यार्थीनीने सांगितली तेथील आपबिती; म्हणाली, “इथं लोक वेड्यासारखं…”
राष्ट्राध्यक्षांचं जगाला आवाहन
“आत्तापर्यंत रशियावर इतर देशांनी घातलेले निर्बंध पुरेस नाहीत. त्यांनी अजून निर्बंध घालायला हवेत”, असं आवाहन वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केलं आहे.