वॉशिंग्टन : रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा ठेवून गेलेल्या युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना प्रत्यक्षात जाहीर दमदाटीला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी चर्चा अर्धवट सोडली आणि अमेरिका, व्हाइट हाऊस आणि अमेरिकी जनतेचे जाहीर आभार मानून तेथील उर्वरित कार्यक्रम रद्द करून निघून जाणे पसंत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेच्या आणि व्हाइट हाऊसच्या इतिहासात प्रथमच एका अभ्यागत राष्ट्रप्रमुखाला जाहीरपणे अशी वागणूक देण्यात आली आहे, तीही थेट देशाच्या सर्वोच्च नेत्याकडून. विशेष म्हणजे या बैठकीचे संपूर्ण जगामध्ये जाहीर प्रसारण झाले, त्यामुळे संपूर्ण जगाने तेथील वाद पाहिला. या अभूतपूर्व घटनेनंतर युरोपीय देशांनी जाहीरपणे युक्रेनला पाठिंबा दिला असून रशिया-युक्रेन युद्ध कसे थांबवायचे असा नवीन पेच उभा राहिला आहे. व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत अध्यक्ष ट्रम्प हे झेलेन्स्की यांच्यावर अक्षरश: खेकसत असल्याचे दिसले. व्हाइट हाऊसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर लक्षावधी लोकांचे जीव धोक्यात घालत असल्याचा आरोप केला. त्यांच्या या कृत्यांमुळे तिसरे विश्वमहायुद्ध होईल असा इशाराही दिला. हे युद्ध युक्रेनमधून इस्रायलमध्ये आणि पुढे आशियात पसरेल असे ट्रम्प म्हणाले.

युद्धसमाप्तीच्या करारासाठी रशियाबरोबर वाटाघाटी करताना युक्रेनची परिस्थिती फारशी चांगली नसून झेलेन्स्की यांच्याकडे नमते घेण्याशिवाय पर्याय नाही असे ट्रम्प यांनी सुचवले. त्याच वेळी झेलेन्स्की यांनी मात्र रशिया आमचे मारेकरी असून त्यांच्याशी कोणतीही तडजोड मान्य नसल्याची भूमिका कायम ठेवली.

त्यानंतर नाराज झालेल्या ट्रम्प यांनी ‘‘तुम्हाला आमच्याशी करार करायचा असेल तर करू शकता, मी तुम्हाला ताकद देऊ शकतो. तुम्ही कणखर आहात पण अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय नाही. तुमच्याकडे फारसे पर्याय नाहीत, एकदा आपण करार केला की तुम्ही अधिक चांगल्या स्थितीमध्ये असाल. पण, आम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी तुम्ही कृतज्ञ नाही आणि ही काही फार चांगली गोष्ट नाही,’’ असे झेलेन्स्की यांना ऐकवले.

या चर्चेदरम्यान रशिया-युक्रेन युद्धसमाप्तीबरोबरच युक्रेनमधील दुर्मीळ खनिजांची अमेरिकेला विक्री करण्याचा करारही मार्गी लागणे अपेक्षित होते. अमेरिकेच्या पाठिंब्यासाठी युक्रेनने खनिजांची विक्री करावी असा ट्रम्प यांचा आग्रह होता. प्रत्यक्षात हा करार न करताच चर्चा अर्धवट सोडून झेलेन्स्की निघून गेले.

झेलेन्स्की यांची पोस्ट

व्हाइट हाऊस सोडल्यांतर काहीच मिनिटांमध्ये झेलेन्स्की यांनी ‘‘धन्यवाद अमेरिका, तुमच्या पाठिंब्यासाठी, या भेटीसाठी आभार. अमेरिकेचे अध्यक्ष, काँग्रेस आणि अमेरिकी जनतेचे आभार. युक्रेनला केवळ शांतता हवी आहे आणि आम्ही त्यासाठीच प्रयत्न करत आहोत,’’ असे ‘एक्स’वर लिहित अमेरिकेचे आभार मानले.

ब्रिटनमध्ये परिषद

अमेरिकेतून निघालेले झेलेन्स्की शनिवारी ब्रिटनला पोहोचले. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी रविवारी आयोजित केलेल्या युरोपीय नेत्यांच्या शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. परिषदेमध्ये फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, इटली, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, स्पेन, तुर्की, फिनलंड, स्वीडन, झेक प्रजासत्ताक आणि रोमानिया या देशांचे नेतेही युद्ध थांबवण्यासाठी चर्चा करतील.