एपी, टॅलिन (एस्टोनिया)

रशिया-युक्रेन युद्धात युद्धविरामाची शक्यता युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी फेटाळली. त्या मागील कारण स्पष्ट करताना झेलेन्स्की म्हणाले, की युद्धविराम काळात रशिया शस्त्रसज्ज होण्यासाठी आणि लष्करीपथकांचे पुनर्घटन करून विरामानंतर रशिया युक्रेनवर नव्या जोमाने हल्ला करण्याचा धोका आहे.

युक्रेनच्या युद्धआघाडीवरील अल्पविराम म्हणजे युद्धविराम अजिबात नाही, असे स्पष्ट करून एस्टोनियाच्या भेटीवर आलेल्या झेलेन्स्की यांनी सांगितले, की असा युद्धविराम रशियाच्या पथ्यावर पडेल. या काळात मिळालेली उसंत रशिया अधिक सज्ज होण्यासाठी वापरेल आणि आम्हाला उद्ध्वस्त करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करेल. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर अधूनमधून मर्यादित युद्धविरामाचे प्रस्ताव मांडले गेले आहेत परंतु ते प्रत्यक्षात आले नाहीत. आतापर्यंत २२ महिन्यांच्या लढाईनंतर आणि संभाव्य प्रदीर्घ संघर्षांच्या शक्यतेने उभय राष्ट्रे शस्त्रसज्ज होण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही देशांतील सुमारे १५०० किलोमीटर (६३० मैल) युद्धआघाडी कडाक्याच्या थंडीत ठप्पच असते. त्यामुळे दोन्ही देशांना लांब पल्ल्याचा मारा करणारा तोफखाना, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनची आवश्यकता भासते.झेलेन्स्की यांनी आरोप केला, की रशिया उत्तर कोरियाकडून तोफखाना-क्षेपणास्त्रे आणि इराणकडून ‘ड्रोन’ खरेदी करत आहे.

Story img Loader